मुंबई (प्रबुध्द राज न्युज):- संविधान संरक्षणासाठी जनतेचा भव्य मेळावा घडविण्याच्या उद्देशाने येत्या २५ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या ‘संविधान सन्मान महासभे’च्या तयारीला वेग आला आहे. महासभेच्या सर्वांगीण नियोजनाचा आढावा घेण्यासाठी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाचा उल्लेख करत, त्या भाषणात व्यक्त केलेले धोके आज प्रत्यक्षात दिसत असल्याचे नमूद केले. “संविधानिक मूल्यांवर उघडपणे हल्ले होत आहेत. नागरिकांनी जागरूक होऊन संविधान रक्षणासाठी एकत्र यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
महासभेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा उल्लेख करत ॲड. आंबेडकर म्हणाले की, मागील संविधान सन्मान महासभेला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. यंदाची सभा त्याहून मोठी, प्रभावी आणि जनतेच्या सहभागाने भरलेली असेल, यासाठी सर्व पातळीवर नियोजन करण्यात येत आहे.
मुंबई प्रदेश कमिटीच्या वतीने देशभरातील प्रतिष्ठित व्यक्तींना महासभेसाठी निमंत्रणे पाठविण्यात आली असून विविध राज्यांत तयारीच्या बैठकाही सतत सुरू आहेत. या महासभेत संविधानवादी जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

दादर येथील बैठकीस मुंबई प्रदेशातील पदाधिकारी, विभागीय जबाबदार, महिला आघाडी, युवा आघाडी आणि विविध घटक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महासभेच्या व्यवस्थापन, प्रचार मोहीम, स्वयंसेवक नियोजन, प्रवास व्यवस्था आणि जनसंपर्क यावर या बैठकित सविस्तर चर्चा झाली.
संविधान मूल्यांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि लोकशाही रक्षणाचा संदेश देशभर पोहोचवण्यासाठी २५ नोव्हेंबरची ही महासभा निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्टपणे संकेत देण्यात आले आहेत.








