मुंबई (प्रतिनिधी): कर्नाटकात प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा “बेगूर कॉलनी” हा कन्नड चित्रपट शंभरीचा यशस्वी टप्पा पार करत आता देशभरात गाजण्यास सज्ज झाला आहे. लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक फ्लायिंग किंग मंजू यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने केवळ व्यावसायिकच नव्हे तर सामाजिक पातळीवरही आपली ठसठशीत छाप उमटवली आहे.
चित्रपटाने १०० दिवसांचा सुवर्ण टप्पा पूर्ण करताच त्याला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले, ही संपूर्ण टीमसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या यशानंतर प्रेक्षकांच्या मागणीवरून या चित्रपटाचे हिंदी रूपांतर करण्यात आले असून त्याला “बी.आर. आंबेडकर मैदान” हे नाव देण्यात आले आहे.
हिंदी आवृत्तीचे लेखन, डबिंग आणि दिग्दर्शन रोनक मोसेस जानुमाला यांनी केले असून, संपूर्ण निर्मिती J.A.D. Productions Pvt. Ltd. अंतर्गत हेड ऑफ प्रॉडक्शन सतीश भटू आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली आहे.

मुंबईतील राजगृह येथे झालेल्या भव्य सोहळ्यात या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य आणि नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, मा. भटू आहिरे, पोस्टर डिझायनर युवराज रोहिदास आहिरे, नगरसेवक जितूभाऊ शिरसाठ, आणि शिरपूर नगरसेवक सुरेश आहिरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शन नगरसेवक शिरसाठ आणि सुरेश आहिरे यांनी केले.
चित्रपटातील प्रेरणादायी गीत सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजात असून त्यांच्या जोशपूर्ण गायकीने चित्रपटाला वेगळी ऊर्जा प्राप्त झाली आहे.
“बी.आर. आंबेडकर मैदान” हा चित्रपट समाजातील दुर्लक्षित घटकांच्या संघर्ष, न्याय आणि स्वाभिमानाचे जिवंत चित्रण प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, हा चित्रपट भारतीय सिनेमात एक नवीन विचारधारात्मक वळण देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








