शिवबाच्या मातीत जन्म, भीमाच्या विचारांतून घडलेली वाघीण; दिव्या शिंदेची ‘बिगबॉस’मध्ये दमदार एंट्री
शिवबाच्या मातीत जन्म, भीमाच्या विचारांतून घडलेली वाघीण; दिव्या शिंदेची ‘बिगबॉस’मध्ये दमदार एंट्री
मुंबई (प्रतिनिधी):- “शिवबाच्या मातीत आणि भीमाच्या विचारांत जन्मल्याचा अभिमान” हे केवळ शब्द नसून ती एक ओळख, एक भूमिका आणि एक लढाऊ वृत्ती आहे. हीच ओळख अभिमानाने मिरवणारी, भीमविचारांची वाघीण दिव्या शिंदे आता देशातील सर्वात चर्चित रिअॅलिटी शो ‘बिगबॉस’मध्ये सहभागी होत आहे. त्यांच्या या प्रवेशाने सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दिव्या शिंदे या केवळ एक स्पर्धक नसून त्या संघर्षातून घडलेल्या, स्पष्ट विचारांची आणि निर्भीड मतांची ओळख म्हणून ओळखल्या जातात. शिवरायांच्या भूमीत जन्म घेऊन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरणा घेत त्यांनी आपली वैचारिक वाटचाल घडवली आहे. सामाजिक अन्यायाविरोधात ठाम भूमिका, स्वाभिमानाने जगण्याचा संदेश आणि महिला सक्षमीकरणाचा आग्रह हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू आहेत.
‘बिगबॉस’सारख्या व्यासपीठावर दिव्या शिंदे यांची उपस्थिती ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, वंचितांचा आवाज, भीमविचार आणि सामाजिक वास्तव लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारी ठरण्याची शक्यता आहे. स्पष्टवक्तेपणा, अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका आणि कुणालाही न घाबरणारी वृत्ती यामुळे त्या घरात वेगळे स्थान निर्माण करतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

दिव्या शिंदे यांच्या ‘बिगबॉस’मधील प्रवेशानंतर तरुण, महिला आणि भीमविचार मानणाऱ्या समाजात उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट, शुभेच्छा आणि चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. “ही केवळ एका स्पर्धकाची एंट्री नाही, तर विचारांची एंट्री आहे,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.




