मतदानाच्या दिवशी सोलापुरात काय बंद राहणार ? नागरिकांसाठी महत्वाची सूचना
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम व ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधींमुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता, पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, त्या दिवशी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत संपूर्ण सोलापूर शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, तसेच आवश्यक प्रशासकीय व्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या धार्मिक कार्यक्रमांतर्गत मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६ रोजी अक्षता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्त नंदीध्वज प्रदक्षिणा होणार असून, काठी मार्गावर रांगोळी काढण्यात येणार आहे. त्यामुळे पर्सीव्हल टाकीवरून होणारा नियोजित सकाळचा पाणीपुरवठा दुपारनंतर सुरू होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
याशिवाय, उजनी व भवानी पेठ पंप हाऊसवर अवलंबून असलेल्या भागांमध्ये तीन दिवसाआड होणारा नियोजित पाणीपुरवठा गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ पासून एका दिवसाने पुढे ढकलण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठ्याचे नियोजन बदल लक्षात घेऊन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठ्यातील या तात्पुरत्या बदलांमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल नागरिकांनी समजून घ्यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

More Stories
सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर
वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात टाळता येतील – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ३७ व्या जिल्हा रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन; ‘जीवनदीप’ पुरस्काराने जीवनदूतांचा गौरव
अक्षता सोहळ्यानंतर मंदिर परिसर झळाळला; जयोस्तुते फाउंडेशनच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक