बाळाच्या स्वागतासाठी घेतलेली रजा ठरली अखेरची; जन्माआधीच जवान प्रमोद जाधवांना मृत्यूने गाठले
बाळाच्या स्वागतासाठी घेतलेली रजा ठरली अखेरची; जन्माआधीच जवान प्रमोद जाधवांना मृत्यूने गाठले
सोलापूर (प्रतिनिधी):- सातारा तालुक्यातील आरेदरे गावावर शोककळा पसरवणारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या होणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सुट्टी घेऊन गावी आलेल्या जवानाला, बाळाच्या जन्माआधीच काळाने हिरावून नेले. जवान प्रमोद जाधव यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला, तर काही तासांनी त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, त्या बाळाला वडिलांचे दर्शन कधीच घडले नाही.

आरेदरे गावचे रहिवासी असलेले जवान प्रमोद जाधव यांचा अवघ्या वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. सध्या त्यांची पत्नी गरोदर असून प्रसूतीसाठी तिला साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पत्नी आणि होणाऱ्या अपत्याच्या जवळ राहण्यासाठी प्रमोद जाधव यांनी आठ दिवसांची रजा घेऊन गावी येण्याचा निर्णय घेतला होता. घरात आनंदाचे वातावरण होते, बाळाच्या आगमनाची तयारी सुरू होती.
मात्र, शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा आनंदाचा क्षण काळजाला चिरणाऱ्या दु:खात बदलला. प्रमोद जाधव दुचाकीवरून जात असताना त्यांच्या वाहनाची एका पिकअप गाडीशी जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की ते रस्त्यावर फेकले गेले आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची बातमी कुटुंबीयांना समजताच सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला. विशेष म्हणजे, रात्री जवानाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर शनिवारी पहाटे त्यांच्या पत्नीची प्रसूती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला. एकीकडे नव्या जीवाचे आगमन, तर दुसरीकडे त्या जीवाच्या वडिलांचे कायमचे जाणे – या विरोधाभासाने संपूर्ण गाव हळहळले.

शनिवारी दुपारी जवान प्रमोद जाधव यांच्या पार्थिवावर आरेदरे गावातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवानाचा अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांची पत्नी आणि नवजात मुलीला स्ट्रेचरवरून स्मशानभूमीत आणण्यात आले. पत्नीने केलेला आक्रोश आणि लेकराकडे पाहत ओघळणारे अश्रू पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. त्या क्षणी अनेकांचे डोळे पाणावले होते.
देशसेवेसाठी समर्पित असलेला जवान, कुटुंबासाठी पाहिलेले स्वप्न आणि जन्माला येणाऱ्या बाळासाठी केलेली तयारी—सगळे काही एका क्षणात संपले. प्रमोद जाधव यांच्या अकाली निधनाने आरेदरे गावाने एक कर्तव्यनिष्ठ जवान गमावला, तर एका नवजात मुलीने वडिलांचे छत्र कायमचे हरपले.
या दु:खद घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून, जाधव कुटुंबीयांवर कोसळलेल्या या आघाताने प्रत्येक संवेदनशील मन हेलावून गेले आहे.



