देश - विदेश

जागतिक कीर्तीचे शिल्पकार डॉ. राम वनजी सुतार यांना उद्या नवी दिल्लीत श्रद्धांजली सभा

जागतिक कीर्तीचे शिल्पकार डॉ. राम वनजी सुतार यांना उद्या नवी दिल्लीत श्रद्धांजली सभा

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह असंख्य ऐतिहासिक शिल्पांचे निर्माते काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली (प्रतिनिधी):- जागतिक कीर्तीचे शिल्पकार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. राम वनजी सुतार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या शनिवार, दि. २७ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा भीम ऑडिटोरियम, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, १५ जनपथ, नवी दिल्ली येथे दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे.

डॉ. राम सुतार यांचे दि. १८ डिसेंबर रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनाने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश आणि जागतिक कला क्षेत्राला मोठी हानी झाली आहे.

डॉ. राम सुतार यांनी सात दशकांहून अधिक काळ शिल्पकलेच्या क्षेत्रात अविरत योगदान दिले. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी शेकडो पुतळे आणि स्मारके साकारली असून, त्यामध्ये भारतीय इतिहास, स्वातंत्र्य चळवळ आणि सामाजिक परिवर्तनाचे महानायक अमर झाले आहेत.

जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार म्हणून डॉ. सुतार यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांची प्रभावी शिल्पे त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.

त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र भूषणसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या शिल्पांमधून भारतीय संस्कृती, मूल्ये आणि इतिहासाचे दर्शन घडते.

या श्रद्धांजली सभेत विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते तसेच देशभरातून आलेले चाहते व शिल्पकलेचे अभ्यासक सहभागी होणार आहेत. डॉ. राम सुतार यांच्या जीवनकार्यावर यावेळी वक्ते आपले विचार व्यक्त करणार आहेत.
डॉ. राम वनजी सुतार यांचे योगदान कायमस्वरूपी प्रेरणादायी असून, त्यांच्या शिल्पकलेतून ते सदैव जिवंत राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त केली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!