सोलापूर विकास मंचच्या पाठपुराव्याला यश! कंबर तलाव–पत्रकार भवन चौकाजवळील रेल्वे पूल होणार चार पदरी

सोलापूर विकास मंचच्या पाठपुराव्याला यश!
कंबर तलाव–पत्रकार भवन चौकाजवळील रेल्वे पूल होणार चार पदरी
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा केंद्रबिंदू ठरलेल्या कंबर तलाव–पत्रकार भवन चौकाजवळील रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे हा पूल चार पदरी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.
हा पूल राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर–विजयपूर मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा दुवा असून जुळे सोलापूर व विजयपूर रोडला जोडणारा मुख्य पूल आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते चार पदरी असताना, पुल मात्र आजतागायत दुपदरीच असल्याने येथे वाहनांचा वेग अचानक कमी होतो. परिणामी, वाहतूक कोंडी वाढून अपघातांची संख्या सातत्याने वाढत होती.
विजयपूर रोड तसेच जुळे सोलापूर परिसरात गेल्या काही वर्षांत नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या पुलावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ होत असून, विशेषतः पीक अवधीमध्ये व कार्यालयीन वेळेत येथे भीषण वाहतूक कोंडी अनुभवास येते. ही समस्या दीर्घकाळ शहरातील ज्वलंत प्रश्न ठरली होती; मात्र याकडे लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये होती.
सोलापूर विकास मंचने या पुलाच्या रुंदीकरणाचा विषय हाती घेत महापालिका आयुक्त, राष्ट्रीय महामार्ग अभियंता तसेच खासदार यांच्याकडे अभ्यासपूर्ण मांडणीसह पाठपुरावा केला. अवघ्या २० दिवसांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारितील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सोलापूरच्या एनएच अधिकाऱ्यांना पत्र प्राप्त झाले असून, त्यात या पुलाचा तांत्रिक प्रकल्प अहवाल (DPR) तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या पत्रामध्ये सोलापूर विकास मंचच्या निवेदनाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
या यशामुळे पुलाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने गेला असून, सोलापूर विकास मंच यापुढेही सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मंचकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आसरा पुलाच्या बाबतीत गेल्या नऊ वर्षांत तीन वेळा भूमिपूजन झाले; मात्र प्रत्यक्ष काम रखडले. पत्रकार भवन चौकातील या रेल्वे पुलाच्या बाबतीत असा प्रकार होणार नाही, असा ठाम विश्वास सोलापूर विकास मंचने व्यक्त केला आहे.
या निर्णयामुळे सोलापूर शहरातील वाहतूक सुरळीत होऊन, अपघातांमध्ये घट होण्याची आणि नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



