“तुम्ही फक्त आरक्षणाचा फायदा घेण्यापुरतेच आहात का?” – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सुशिक्षित बहुजन वर्गाला थेट सवाल
“तुम्ही फक्त आरक्षणाचा फायदा घेण्यापुरतेच आहात का?” – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सुशिक्षित बहुजन वर्गाला थेट सवाल
मुंबई (प्रतिनिधी):- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बहुजन समाजातील सुशिक्षित आणि नोकरदार वर्गाला उद्देशून अत्यंत परखड आणि जळजळीत सवाल उपस्थित केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) लागू केलेल्या भेदभावविरोधी नियमांवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर, आंबेडकरांनी बहुजन समाजाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
UGC ने शैक्षणिक संस्थांमध्ये जाती, धर्म, वंश, लिंग तसेच दिव्यांगत्वावर आधारित भेदभाव रोखण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली होती. या नियमांचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण देणे हा होता. मात्र, काही सवर्ण व विशिष्ट गटांनी या नियमांविरोधात आक्रमक आंदोलन केले. या आंदोलनानंतर सुप्रीम कोर्टाने या नियमांना स्थगिती दिली.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन समाजातील सुशिक्षित आणि नोकरीत असलेल्या वर्गावर टीकेची झोड उठवली आहे.
“जेव्हा जातिवादी मानसिकतेचे गट रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते, तेव्हा बहुजन समाजाचा सुशिक्षित वर्ग कुठे होता?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
“तुम्ही फक्त बाबासाहेबांच्या संघर्षामुळे मिळालेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आहात का? अन्यायाविरोधात उभं राहणं, लढणं हे तुमचं कर्तव्य नाही का?” असा टोकदार प्रश्न उपस्थित करत, आंबेडकरांनी शांत बसलेल्या बहुजन वर्गावर प्रस्थापित व्यवस्थेला अप्रत्यक्ष पाठबळ देत असल्याचा आरोप केला आहे.
तुम्ही कितीही शिक्षण घेतलं, कितीही मोठ्या पदावर गेलात तरी जातिवादी मानसिकता तुम्हाला तुमच्या जातीच्या चष्म्यातूनच पाहते, ही कटू वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली. रोहित वेमुला आणि पायल तडवी यांच्या मृत्यूंचा संदर्भ देत, “आज तुम्ही गप्प बसलात तर उद्या तुमचीच मुले बळी ठरणार नाहीत याची खात्री आहे का?” असा जळजळीत सवालही त्यांनी उपस्थित केला.
आंबेडकर म्हणाले की, आजची पिढी सुखात आहे कारण त्यांच्या आजी-आजोबांनी आणि आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून चळवळ जिवंत ठेवली. त्यांनी वेळ, पैसा आणि आयुष्य पणाला लावले. मात्र, ही पिढी आता इतिहासाचा भाग होत असताना, आजचा सुशिक्षित व नोकरदार बहुजन वर्ग चळवळीसाठी नेमकं काय योगदान देतो आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“आज जर आपण आपल्या हक्कांसाठी, न्यायासाठी रस्त्यावर उतरलो नाही, तर पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही,” असा कडक इशाराही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
त्यांच्या या परखड भूमिकेमुळे सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, बहुजन समाजातील सुशिक्षित वर्ग आता काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



