१५ लाखांच्या लाचेचा सौदा; अन्न-औषध प्रशासन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंगमुळे प्रकरण उघड; कोल्हापूरात अधिकाऱ्याविरोधात गुन्हा
१५ लाखांच्या लाचेचा सौदा; अन्न-औषध प्रशासन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंगमुळे प्रकरण उघड; कोल्हापूरात अधिकाऱ्याविरोधात गुन्हा
कोल्हापूर :- गुटखा प्रकरण दाबून टाकण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून अन्न व औषध प्रशासन विभागातील तत्कालीन अधिकारी मंगेश मल्हार लवटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या लवटे सोलापूर येथे कार्यरत असून, या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील हॉटेल व्यावसायिक वसीम खुदबुद्दीन शेख (वय ४२) यांनी याबाबत महाराष्ट्र उप लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी फिर्याद दिल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
१७ एप्रिल २०२३ रोजी मंगळवेढा येथे गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडण्यात आली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये किंवा नाव वगळण्यासाठी लवटे यांनी संबंधितांना संपर्क साधल्याचे समोर आले आहे. त्यांनी हॉटेल व्यावसायिक शेख यांना संदेश पाठवत, “गुन्ह्यातून नाव वगळतो,” असे सांगितले होते.
*मध्यस्थामार्फत पैशांची मागणी*
लवटे यांनी स्वतः पुढे न येता शेख यांच्या माध्यमातून कर्नाटकातील गुटखा व्यापाऱ्याकडून १५ लाख रुपये मिळवून देण्याचा दबाव टाकला. “पैसे मिळवून दिले नाहीत तर तुझ्यावरच गुन्हा दाखल करू,” अशी धमकीही त्यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
*व्हॉट्सअॅप कॉल ठरला पुरावा*
कारवाई टाळण्यासाठी लवटे यांनी व्हॉट्सअॅप कॉलचा वापर केला. मात्र, शेख यांनी या संभाषणाचे दुसऱ्या मोबाईलवर रेकॉर्डिंग करून ठेवले होते. हेच रेकॉर्डिंग या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.



