स्वच्छता, पाणी व नियोजनावर भर; सोलापूर जिल्हा परिषदेत प्रशिक्षण शिबिर
पाठीमागील बाकावर बसले अध्यक्ष-उपाध्यक्ष; नम्रतेची चर्चा रंगली

स्वच्छता, पाणी व नियोजनावर भर; सोलापूर जिल्हा परिषदेत प्रशिक्षण शिबिर
पाठीमागील बाकावर बसले अध्यक्ष-उपाध्यक्ष; नम्रतेची चर्चा रंगली
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा परिषदेत नवनियुक्त सदस्य व पंचायत समिती सभापतींसाठी आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात शाश्वत विकास ध्येय (SDG) प्रभावीपणे राबवण्यासाठी सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्यासह विविध समिती सभापती, अधिकारी व सदस्य उपस्थित होते.

डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले की, शाश्वत विकास ध्येयांची अंमलबजावणी गावपातळीवर प्रभावीपणे करणे आवश्यक आहे. १५ व्या वित्त आयोगातील ६०% निधी पाणी व स्वच्छतेसाठी वापरणे गरजेचे आहे
प्लास्टिक हटवून पुनर्वापरावर भर द्यावा.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबवावे.
“स्वच्छता दूत म्हणून काम करण्याचा निर्धार करा,” असे आवाहन त्यांनी सदस्यांना करत गावागावात स्वच्छतेची चळवळ उभी करण्यावर भर दिला.

उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी १५ वा व १६ वा वित्त आयोगाच्या निधीच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती सदस्यांना द्यावी अशी मागणी केली.
महिला व बालकल्याण सभापती अॅड. अमृता वाघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यशदाचे उपसंचालक आनंद पुसावळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कामकाजाची माहिती सोप्या भाषेत दिली.
माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी स्पष्ट केल्या.
माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून काम करण्याचे आवाहन करत “भांडणात वेळ घालवू नका, विकासावर लक्ष केंद्रित करा,” असा सल्ला दिला.

या कार्यक्रमाला शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, वित्त उपसंचालक रमेश लिदडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. या प्रशिक्षणासाठी कक्ष अधिकारी सचिन साळुंखे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे व संबंधित कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या प्रशिक्षणात एक वेगळीच बाब लक्षवेधी ठरली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार तसेच सभापती चेतनसिंह केदार व रामप्पा चिवडशेट्टी यांनी सभागृहाच्या पाठीमागील बाकावर बसून प्रशिक्षण घेतले. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या साधेपणाची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.
या प्रशिक्षणातून नव्या सदस्यांना विकास आराखडा, निधी नियोजन, कायदे आणि प्रशासनिक समन्वय याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन आणि शाश्वत विकास हेच पुढील काळातील मुख्य प्राधान्य ठरणार असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


