यात्रेच्या दिवशी शेतात गेलेला मुलगा… काही तासांत उघडकीस आला धक्कादायक प्रकार!
कासेगावात १६ वर्षीय मुलाची आत्महत्या; घटनेमागील कारणांवर चर्चांना उधाण
यात्रेच्या दिवशी शेतात गेलेला मुलगा… काही तासांत उघडकीस आला धक्कादायक प्रकार!
कासेगावात १६ वर्षीय मुलाची आत्महत्या; घटनेमागील कारणांवर चर्चांना उधाण
सोलापूर (प्रतिनिधी):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे १६ वर्षीय युवकाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावात विविध चर्चांना उधाण आले आहे.
हरिदास अशोक मोरे (वय १६) असे मृत मुलाचे नाव असून, रविवारी सकाळी सुमारे ८ वाजता ही घटना उघडकीस आली. त्या दिवशी गावात यात्रा असल्याने उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी वडिलांनी हरिदासला शेतात जाण्यास सांगितले होते. मात्र, यात्रेच्या दिवशी शेतात जाण्याबाबत त्याने नाराजी व्यक्त केली होती.
रागाच्या भरात तो मित्राच्या दुचाकीवरून शेताकडे गेला. त्याच्या वागण्यात अस्वस्थता जाणवल्याने कुटुंबीयांना शंका आली. काही वेळाने त्याचा भाऊ शेतात गेला असता, शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरी बांधून हरिदासने गळफास घेतल्याचे आढळून आले.
भावाने तातडीने दोरी कापून त्याला खाली उतरवले आणि कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर हरिदासला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, हरिदास हा क्रीडाप्रेमी आणि कुस्तीपटू होता. शालेय स्तरावर ६२ किलो वजनी गटात त्याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला होता आणि राज्यस्तरासाठी त्याची निवडही झाली होती. त्यामुळे त्याच्या अकाली निधनाने क्रीडा क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गावात मोबाईलच्या मागणीवरून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
ही घटना केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी विचार करायला लावणारी ठरली आहे.



