दोन मिरवणुकींना पूर्णविराम; भीमसैनिकांच्या एकतेसाठी १९ एप्रिल ठरला अंतिम दिवस
१९ एप्रिलला एकच भव्य मिरवणूक

दोन मिरवणुकींना पूर्णविराम; भीमसैनिकांच्या एकतेसाठी १९ एप्रिल ठरला अंतिम दिवस
१९ एप्रिलला एकच भव्य मिरवणूक
सोलापूर (दि.६) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात यंदा एकत्रित आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. १९ एप्रिल (रविवार) रोजी एकच भव्य मिरवणूक निघणार असून, पूर्वीचा २१ एप्रिलचा निर्णय मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समितीने मागे घेतला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समिती आणि पोलीस आयुक्त यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीत मिरवणुकीदरम्यान शिस्त, वेळेचे नियोजन आणि वाहतुकीचे नियंत्रण यावर विशेष भर देण्यात आला.
समितीच्या वतीने विश्वस्त राजा सरवदे, राजा इंगळे आणि सुबोध वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, “भीमसैनिकांच्या एकतेची भावना जपण्यासाठी एकच मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरात उत्सव अधिक सुव्यवस्थित आणि भव्य स्वरूपात साजरा होईल.”

मिरवणूक पारंपारिक मार्गानेच काढण्यात येणार असून, कोणतेही मंडळ ठरावीक ठिकाणी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. तसेच मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
यावर्षीच्या मिरवणुकीत सुमारे २१० मंडळांचा सहभाग अपेक्षित असून, सर्व मंडळांनी साऊंड सिस्टमसाठी ठरावीक नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. “एक बेस, एक टॉप” या नियमानुसार ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या पत्रकार परिषदेला प्रविण निकाळजे, संजीव सदाफुले, अरुण भालेराव, शशी कांबळे, के.डी. कांबळे, अजित गायकवाड, बबलू गायकवाड आणि पृथ्वीराज सरवदे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापुरात आंबेडकर जयंतीचा उत्सव एकत्रितपणे, शिस्तबद्ध आणि अधिक प्रभावीपणे साजरा होणार असल्याने भीमसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



