मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि सर्वांचे लाडके ‘हि-मॅन’ धर्मेंद्र यांच्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले धर्मेंद्र यांना आज अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत.
३१ ऑक्टोबरपासून मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये धर्मेंद्र उपचारासाठी दाखल होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे.

आज सकाळी साडेसात वाजता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून घरी नेण्यात आले. त्यांचा मुलगा बॉबी देओल स्वतः रुग्णवाहिकेतून वडिलांना घरी घेऊन गेला, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
कुटुंबीयांनी सांगितले की, “धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरातच निगराणीत उपचार सुरू ठेवण्यात येतील.”
गेल्या काही दिवसांत धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळ ते आयसीयूमध्ये उपचाराधीन होते. या काळात त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती.
काल त्यांच्या निधनाची अफवा पसरल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. मात्र देओल कुटुंबाने ती बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट केले, आणि आता धर्मेंद्र यांच्या डिस्चार्जमुळे चाहत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

धर्मेंद्र सध्या घरी विश्रांती घेत आहेत आणि डॉक्टरांच्या सूचनेनुसार उपचार सुरू ठेवले जाणार आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावरून “लवकर बरे व्हा धर्मेंद्रजी” असे संदेश देत अभिनेत्याच्या आरोग्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.








