मुंबई : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी सरकारकडून महत्त्वाची पावले उचलली जाणार आहेत. कुकडी कालव्याची दुरुस्ती करणे आणि जलबोगद्याद्वारे माणिकडोह धरणामध्ये अधिक पाणी सोडणे अत्यावश्यक आहे, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात झालेल्या रिठेवाडी उपसा सिंचन योजनेबाबतच्या बैठकीत करमाळा तालुक्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीत माणिकडोह धरणामध्ये अधिक पाणी आणण्यासाठी जलबोगदा तयार करण्याची योजना, तसेच कुकडी कालव्यातून पाणी करमाळा तालुक्यात आणून तेथील बंधारे आणि लहान धरणांमध्ये साठवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, “करमाळा तालुक्यातील शेती सिंचनावर अवलंबून आहे. त्यामुळे पाणी नियोजन व्यवस्थित राहणे गरजेचे असून या दिशेने ठोस उपाययोजना करण्यात येतील.”
या बैठकीस ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार नारायण आबा पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, सहसचिव अलका आहेरराव, मुख्य अभियंता चोपडे, तसेच लाभ क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सिंचनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, जलवाहिनीचे दुरुस्ती काम, तसेच धरणांमधील पाणीसाठ्याचे व्यवस्थापन या सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, “करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा नियमित व्हावा यासाठी सर्व कामे नियोजनबद्ध आणि तातडीने पूर्ण करा.”








