मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासन सज्ज झाले असून, नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने सूक्ष्म नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले आहेत.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे.
बैठकीदरम्यान अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर विभागीय आयुक्त (कोकण) सिद्धराम सालीमठ, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, नगरविकास विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्या, तसेच महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चैत्यभूमी परिसरात मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय सुविधा, आरोग्य सेवा, आणि प्रकाशयोजना यासारख्या मूलभूत सोयींची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दादर व आसपासच्या परिसरात वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिसांना योग्य नियोजन व नियंत्रणाचे निर्देश देण्यात आले असून, अनुयायांना मार्गदर्शन मिळावे म्हणून जागोजागी सूचना फलक आणि हेल्पडेस्क उभारण्यात येणार आहेत.
मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सर्व विभागांना स्पष्ट सूचना दिल्या की, “प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी आणि अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये, हीच शासनाची प्राथमिकता आहे.”
राज्य प्रशासन, मुंबई महानगरपालिका, पोलीस यंत्रणा, आणि सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून यंदाचा महापरिनिर्वाण दिन सुव्यवस्थित आणि अनुशासित पद्धतीने पार पाडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.








