मुंबई :-शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना आता आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचा थेट लाभ मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळणार असून, प्रत्येक कर्मचाऱ्याने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ आयुष्मान कार्ड तयार करून घ्यावे, अशा सूचना महाराष्ट्र शासनाच्या राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून (SHAS) देण्यात आल्या आहेत.
राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब खेडकर (भा.प्र.से.) यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी हे या योजनेअंतर्गत पात्र असून, त्यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे Beneficiary Login द्वारे आयुष्मान कार्ड त्वरित तयार करावे.

ही सूचना २४ ऑगस्ट २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विशेष मोहिमेच्या रूपात राबविण्यात येणार आहे. यादरम्यान प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपले कार्ड तयार केलेले असावे. याबाबत जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी संबंधित विभागांना याची जबाबदारीने अंमलबजावणी करावी.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, राज्य शासनाच्या कार्यालयांमध्ये कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच निमशासकीय संस्थांमधील कर्मचारी हे या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत. या कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना राज्यातील व देशातील अधिकृत आरोग्यसेवा केंद्रांमध्ये मोफत उपचार मिळू शकतील.
या उपक्रमामुळे शासकीय कर्मचारी वर्गाला आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य विमा कवचाची मर्यादा पाच लाख रुपये इतकी असेल. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब खेडकर यांनी स्पष्ट केले की,
> “शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपले आणि आपल्या कुटुंबियांचे आयुष्मान कार्ड तयार करून घ्यावे. हा उपक्रम सर्वांसाठी आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.”








