चिटफंड व मल्टिस्टेट घोटाळ्यांवर लोकसभेत आवाज; अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची मागणी
चिटफंड व मल्टिस्टेट घोटाळ्यांवर लोकसभेत आवाज; अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची मागणी
नवी दिल्ली : विविध चिटफंड कंपन्या आणि मल्टिस्टेट क्रेडिट सोसायट्यांमध्ये सामान्य नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे पैसे अडकून पडल्याच्या गंभीर मुद्द्याकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी ठाम मागणी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
पल्स इंडिया लिमिटेड, समृद्ध जीवन, सहारा इंडिया लिमिटेड, इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गुरुप्रसाद इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या चिटफंड कंपन्यांमध्ये तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी, राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी, साईराम अर्बन बँक, भगवान बाबा मल्टीस्टेट यांसारख्या मल्टिस्टेट संस्थांमध्ये नागरिकांचे कष्टाचे पैसे अडकले असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले.
या प्रकरणांमुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली असून, अनेक नागरिक आपल्या आयुष्याची जमापूंजी गमावण्याच्या मार्गावर असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली. अशा कंपन्या व संस्थांवर कठोर कारवाई करताना नागरिकांचे पैसे सुरक्षित ठेवणे व त्यांचा परतावा मिळवून देणे ही सरकारची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले.
लोकसभेच्या लोकसभा हिवाळी अधिवेशनात बोलताना त्यांनी केंद्र सरकारकडे प्रमुख मागण्या मांडल्या, चिटफंड व मल्टिस्टेट घोटाळ्यांतील सर्व प्रकरणांची सखोल आणि वेळबद्ध चौकशी,दोषी संचालक, पदाधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई,अडकलेली रक्कम जप्त करून थेट गुंतवणूकदारांना परतावा,भविष्यात अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी कडक नियमन आणि नियंत्रण यंत्रणा नागरिकांच्या मेहनतीच्या पैशांचे संपूर्ण संरक्षण करण्यासाठी सरकारने केवळ आश्वासने न देता सक्रिय भूमिकेतून ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या मुद्द्यावर सरकार काय निर्णय घेते, याकडे देशभरातील फसवणूकग्रस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे.



