प्रामाणिक वाहकाला अखेर न्याय; कास्ट्राईब संघटनेच्या हस्तक्षेपानंतर एसटी वाहकाचे निलंबन रद्द
प्रामाणिक वाहकाला अखेर न्याय; कास्ट्राईब संघटनेच्या हस्तक्षेपानंतर एसटी वाहकाचे निलंबन रद्द
सोलापूर (प्रतिनिधी):- मंगळवेढा–सोलापूर मार्गावरील एसटी बस प्रकरणात नियमबाह्य व बेकायदेशीररीत्या निलंबित करण्यात आलेल्या मंगळवेढा आगारातील वाहक हनुमंत सरवदे यांना अखेर दिलासा मिळाला असून, त्यांचे निलंबन अधिकृत आदेशाने रद्द करण्यात आले आहे. कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या ठोस निवेदनामुळे आणि पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे सोलापूर जिल्हा विभागीय सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांनी दिली.
सदर प्रकरणात इयत्ता सातवीत शिकणारा, मात्र पूर्ण तिकिटास पात्र असलेला एक विद्यार्थी पासशिवाय आणि तिकिटासाठी पैसे नसल्याने एसटी बसमधून प्रवास करत होता. कर्तव्यावर असलेले वाहक हनुमंत सरवदे यांनी पासाची विचारणा केली असता विद्यार्थ्याने पास घरी राहिल्याचे सांगितले. मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि महामंडळाची प्रतिमा अबाधित ठेवत वाहकाने विद्यार्थ्याला तिकिटासाठी आर्थिक मदत करून नियमानुसार योग्य ठिकाणी बसमधून उतरवले.
मात्र या घटनेची वस्तुस्थिती न तपासता आणि प्रशासकीय चौकशीशिवाय एका दैनिकात दिशाभूल करणारी बातमी प्रसिद्ध झाल्याने प्रशासनाने घाईघाईने वाहक सरवदे यांना निलंबित केले. या निर्णयामुळे एसटी महामंडळात आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
या अन्यायकारक कारवाईची दखल घेत कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. निवेदनात निलंबन करताना शिस्त व अपील कार्यपद्धतीतील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
या प्रकरणाची सखोल कायदेशीर चौकशी करून अहवाल सादर करण्यात आल्यानंतर विभाग नियंत्रकांनी दि. १३ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आलेले निलंबन दि. १६ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत आदेशाने रद्द केले. त्यामुळे एका प्रामाणिक व कष्टकरी कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर येणारे संकट टळले.
या निर्णयाबद्दल कास्ट्राईब संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नागनाथ सर्वगोड, कोषाध्यक्ष विजयकुमार क्षीरसागर, कार्याध्यक्ष नागनाथ (अण्णा) वाघमारे, सोलापूर आगार अध्यक्ष सुनिल गायकवाड, सरचिटणीस बालाजी कांबळे, तसेच मंगळवेढा आगाराचे अध्यक्ष ईश्वर आठवले व सरचिटणीस चंद्रकांत बनसोडे यांनी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी आणि प्रशासनाचे आभार मानले.
या घटनेतून प्रामाणिक कर्मचाऱ्यांना संघटनेच्या पाठबळामुळे वेळेत न्याय मिळू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



