अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- नेवासा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचाराचा पुरावा म्हणून मोठी कारवाई समोर आली आहे. भूकरमापक अजयभानसिंग गुलाबसिंग परदेशी (वय ४८) यांना १.५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शासनाच्या शेतकरी सुविधांशी संबंधित असलेल्या कामातही खाजगी फायदा घेण्यासाठी पदाचा गैरवापर झाल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई पाथरवाला गायगव्हाण (ता. नेवासा) येथील शिवरस्त्यावरील दीर्घकालीन वादातून उगम पावली. तक्रारदारासह इतर शेतकऱ्यांनी 2022 मध्ये शिवरस्ता खुला करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. सुरुवातीला मोजणीसाठी खर्च शेतकऱ्यांकडून मागण्यात आला होता; मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खर्च शासनाने करावा लागणार असल्याने फेब्रुवारी 2023 मध्ये शिवार रस्ता खुला करण्यात आला.
यानंतर मार्च 2025 मध्ये रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम मंजूर झाले. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी पुन्हा मोजणीसाठी अर्ज करून शुल्क भरले. ६ जून २०२५ रोजी झालेल्या नव्या मोजणीत गोंधळ निर्माण झाला आणि रस्ता पुन्हा बंद झाला.
रस्ता पुन्हा बंद झाल्यानंतर तक्रारदाराने ३० जून रोजी नव्याने मोजणी अर्ज दाखल केला. यावेळी अजयभानसिंग परदेशी यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून आधीच्या चुकीच्या मोजणीला बदलण्यासाठी आणि दुसऱ्या अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याच्या बदल्यात ₹१.५ लाखांची लाच मागितली. ही मागणी ३ डिसेंबर रोजी अधिकृतपणे झाली असल्याचे ACB ला मिळालेल्या तक्रारीत नमूद आहे. तक्रारीनंतर नाशिक ACB ने पथक उभारून सापळा रचला.
कारवाईत सहभागी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक,अंमलदार प्रफुल्ल माळी,विलास निकम, विनोद पवार
यांनी गुरुवार (दि. ४ डिसेंबर) पंचासमक्ष लाच स्वीकारताना आरोपी परदेशीला जेरबंद केले. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
भूमी अभिलेख कार्यालयातील या प्रकारामुळे शेतकऱ्यांची कामे वर्षानुवर्षे रखडत राहण्यामागील खऱ्या कारणांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाच्या लाभाच्या योजनाही ‘लाच’ आणि ‘प्रभाव’ यांच्या छायेत अडकत असल्याचे चित्र यातून समोर आले आहे.

More Stories
माळढोक अभयारण्यात वन विभागाची धडक कारवाई; मुरूम उपशात वापरलेली टिपर व जेसीबी जप्त
जातीवाचक शिवीगाळ, खंडणी प्रकरणात आरोपी निर्दोष — सबळ पुरावा नसल्याने न्यायालयाचा निर्णय
लाचेसाठी ‘डील’ आणि केसात हात फिरवत सिग्नल — महिला पोलीस अंमलदार ₹२०,००० घेताना एसीबीच्या सापळ्यात अडकली!”