Prabuddha Raj

Latest Marathi News

“अनाथ मुलांना आरक्षणाचा निर्णय हा जीवनातील सर्वात समाधानाचा” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यातील अनाथ युवक-युवतींसाठी ऐतिहासिक आणि मानवी मूल्यांनी सजलेला निर्णय घेतल्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले. शासन सेवेत निवड झालेल्या अनाथ युवक-युवतींशी वर्षा शासकीय निवासस्थानी संवाद साधताना त्यांनी हा भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाला विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय तसेच निवड मिळालेल्या युवक-युवती उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ‘Equal Opportunity’ या संविधानिक तत्त्वावर आधारित राहून राज्य शासनाने १ टक्का अनाथ आरक्षण लागू केले. या निर्णयामुळे ८६२ अनाथ युवक-युवती आता स्वावलंबी होत आहेत, ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून मानवी संवेदनांनी भारलेली कृती असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान बोलताना फडणवीस भावूक झाले आणि म्हणाले ,“आज या निर्णयाचा खरा अर्थ जाणवला. निःशब्द भावना शब्दांपेक्षा अधिक बोलतात. अनेक निर्णय घेतले जातात, पण काही निर्णय मनाला गहिवर देतात — आणि अनाथांना आरक्षण देणे हा त्यापैकीच एक निर्णय आहे.”

मुख्यमंत्री पुढे म्हणाले “आपण जे काही साध्य करतो ते समाजामुळे शक्य होते. त्यामुळे समाजाला परत काही देणे हा प्रत्येकाचा धर्म आहे.”

त्यांनी या युवकांना पुढे जाऊन आदर्श ‘Role Model’ बनण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. याच दिवशी अशा संवेदनशील आणि परिवर्तनात्मक कार्यक्रमाने वर्षपूर्तीला अर्थपूर्ण सुरुवात झाल्याचे ते म्हणाले. राज्यातील अनाथ मुलांना प्रशासनात स्थान मिळण्याचा हा ऐतिहासिक टप्पा असून, शासनाने घेतलेला हा निर्णय सामाजिक न्याय, मानवता आणि संवेदनशील प्रशासनाचे प्रतीक ठरत आहे.