महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीला भगदाड; लाखो लिटर पाणी वाहत आहे रस्त्यावर, नागरिकांनी उपस्थित केला मोठा सवाल
उजनी–सोलापूर पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळती; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी
महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीला भगदाड; लाखो लिटर पाणी वाहत आहे रस्त्यावर, नागरिकांनी उपस्थित केला मोठा सवाल
उजनी–सोलापूर पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळती; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेला उजनी जलाशयातून पिण्याचे पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुणे महामार्गावरील टेंभुर्णीजवळ वेणेगाव ग्रामपंचायतसमोर, जगदंबा कॉटेज परिसरात फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. या गळतीमुळे हजारो नव्हे तर लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असून, संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे मौल्यवान पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सोलापूर शहरातील नागरिकांना सध्या पाच दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत मुख्य जलवाहिनीतील गळती अनेक तास सुरू असतानाही ती तातडीने दुरुस्त करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या दाबाने पाणी बाहेर पडत असून परिसरात पाण्याचे लोट वाहताना दिसत आहेत. एका बाजूला नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना दुसऱ्या बाजूला लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“पाणी वाचवा”चा संदेश देणाऱ्या प्रशासनाने प्रत्यक्षात अशा मोठ्या गळतीकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. ही गळती तातडीने बंद करून जलवाहिनीची दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नियमित देखभाल व तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन गळती थांबवावी, पाण्याची होणारी मोठी नासाडी रोखावी आणि जबाबदार यंत्रणेकडून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.



