‘विठ्ठल नामाचा गजर’… कुचन प्रशालेत वारकरी दिंडी आणि रिंगण सोहळ्याने अनुभवली आषाढीची भक्तिमय पर्वणी
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी, फुगडी, काटवट आणि रिंगणाने रंगली विठ्ठलभक्ती

‘विठ्ठल नामाचा गजर’… कुचन प्रशालेत वारकरी दिंडी आणि रिंगण सोहळ्याने अनुभवली आषाढीची भक्तिमय पर्वणी
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी, फुगडी, काटवट आणि रिंगणाने रंगली विठ्ठलभक्ती
सोलापूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण येथे वारकरी परंपरेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी वारकरी दिंडी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून टाकला.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीच्या मिरवणुकीने झाली. पालखीसह विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पायी दिंडी काढत “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल”च्या जयघोषात परिसर दुमदुमून सोडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची आरती करण्यात आली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवणारा रिंगण सोहळा सादर केला. फुगडी, काटवट यांसारखे पारंपरिक वारकरी खेळ सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुरावटीत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या कार्यक्रमाला प्रशालेचे प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगु, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सूत्रसंचालन सहशिक्षिका अनुप्रिता हजारे यांनी केले. वारकरी परंपरेतील संस्कार, शिस्त, भक्ती आणि सामाजिक ऐक्याची भावना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.



