राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला आता रु ६.५० लाखांपर्यंत मदत
राज्यातील लाखो नोंदणीकृत कामगारांना होणार फायदा

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला आता रु ६.५० लाखांपर्यंत मदत
राज्यातील लाखो नोंदणीकृत कामगारांना होणार फायदा
मुंबई, दि. १४ जुलै : राज्यातील लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कामगार विभागाने बांधकाम कामगारांच्या सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य वाढविण्याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. या निर्णयामुळे कामगाराच्या नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यूनंतर तसेच कामाच्या ठिकाणी अपघातामुळे अपंगत्व आल्यास कुटुंबाला किंवा संबंधित कामगाराला अधिक आर्थिक मदत मिळणार आहे.
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना ३ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल.

याशिवाय, कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ६ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय बांधकाम क्षेत्रात काम करताना जीव गमावणाऱ्या कामगारांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

तसेच, कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे बांधकाम कामगार कायमस्वरूपी दिव्यांग झाल्यास त्याला २ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. अपघातामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रातील लाखो नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा मिळण्यास मदत होणार असून, कामगार कल्याण योजनांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या निर्णयाचे कामगार संघटना आणि विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.



