सोलापूर

प्रलंबित वेतन, रखडलेली देयके अन् प्रसिद्धी निधीचा वाद; जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांच्या कारभाराची विभागीय चौकशी वेगात

१०२ रुग्णवाहिका चालकांचे वेतन वर्षभर रखडल्याचा आरोप; २० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले, प्रसिद्धी निधी आणि सोशल मीडिया बिलांबाबतही नाराजी

प्रलंबित वेतन, रखडलेली देयके अन् प्रसिद्धी निधीचा वाद; जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांच्या कारभाराची विभागीय चौकशी वेगात

१०२ रुग्णवाहिका चालकांचे वेतन वर्षभर रखडल्याचा आरोप; २० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले, प्रसिद्धी निधी आणि सोशल मीडिया बिलांबाबतही नाराजी

सोलापूर : जिल्हा आरोग्य विभागातील आर्थिक आणि प्रशासकीय कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून, जिल्हा लेखा व्यवस्थापक (डीएएम) वैशाली थोरात यांच्या कामकाजाविरोधातील विविध तक्रारींची विभागीय स्तरावर चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीसाठी विभागीय कार्यालयातील चार सदस्यीय पथक शुक्रवारी आणि शनिवारी सोलापुरात दाखल झाले होते. पथकाने जिल्हा आरोग्य विभागातील २० पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

चौकशीत १०२ रुग्णवाहिका सेवेतील चालक व कर्मचाऱ्यांचे जवळपास वर्षभरापासून प्रलंबित असलेले वेतन, कंत्राटदारांची रखडलेली बिले, विविध आर्थिक प्रस्तावांना मंजुरी देण्यास झालेला विलंब, एनएचएम कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे प्रस्ताव थांबविणे तसेच जाहिरात व प्रसिद्धीशी संबंधित देयकांचा निपटारा न झाल्याच्या तक्रारींचा समावेश असल्याचे समजते.

वेळेत वेतन न मिळाल्यामुळे अनेक रुग्णवाहिका चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याची तक्रार आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाजात वारंवार विलंब, फाईली प्रलंबित ठेवणे आणि कर्मचाऱ्यांशी वर्तणुकीबाबतही वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा आरोग्य विभागातील प्रलंबित कामांवरून जिल्हा आरोग्याधिकारी आणि जिल्हा लेखा व्यवस्थापक यांना फटकारल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. प्रलंबित देयके तातडीने निकाली न काढल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आल्याचेही समजते.

जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात या यापूर्वीपासूनच प्रसिद्धी व जाहिरात विषयक कामकाजाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षीच्या आषाढी वारीदरम्यान प्रसिद्धीचे काम करणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारांचे बिल निधी उपलब्ध असतानाही अदा करण्यात आले नसल्याची तक्रार संबंधित पत्रकारांनी केली होती.

याबाबत अनेक पत्रकारांनी वारंवार कार्यालयात भेटी देऊन पाठपुरावा केला, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, असा आरोप करण्यात आला होता. अखेरीस उपलब्ध निधी खर्च न होता परत गेल्याचाही दावा संबंधित पत्रकारांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी व जाहिरात देयकांबाबतच्या तक्रारीही आता चर्चेत आल्या आहेत.

अधिकाऱ्यांची भूमिका

“विभागीय स्तरावर चौकशी सुरू असून त्यासाठी बाहेरील अधिकारी आले होते. त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.”

डॉ. सतीष कोपुरवाड, जिल्हा आरोग्याधिकारी

“जिल्हा लेखा व्यवस्थापकांविरोधातील तक्रारींची चौकशी सुरू आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील निर्णय व आवश्यक कारवाई करण्यात येईल.”

डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!