डॉ. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या वळसंगच्या ऐतिहासिक विहिरीसाठी ४ कोटींच्या विकासनिधीची मागणी
सुशोभीकरण, पर्यटन विकास आणि ऐतिहासिक स्मारक संवर्धनासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना निवेदन

डॉ. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या वळसंगच्या ऐतिहासिक विहिरीसाठी ४ कोटींच्या विकासनिधीची मागणी
सुशोभीकरण, पर्यटन विकास आणि ऐतिहासिक स्मारक संवर्धनासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना निवेदन
मुंबई/सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील ऐतिहासिक विहिरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि परिसर सुशोभीकरणासाठी ४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे यांनी समस्त वळसंग ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांना निवेदन सादर करून ही मागणी केली.

वळसंग येथील ही विहीर सामाजिक समतेच्या चळवळीचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा ऐतिहासिक साक्षीदार मानली जाते. १९३७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी भेट देत विहिरीचे उद्घाटन केले होते. त्या घटनेमुळे या विहिरीला राज्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक वारसा स्थळांपैकी एक म्हणून ओळख मिळाली आहे.
इतिहासातील नोंदीनुसार, स्थानिक दलित समाजबांधवांनी “जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विहिरीचे पाणी ग्रहण करत नाहीत, तोपर्यंत आम्हीही पाण्याला स्पर्श करणार नाही,” असा निर्धार केला होता. त्यानंतर डॉ. आंबेडकरांनी रेशमी धागा आणि चांदीचा ग्लास वापरून विहिरीचे उद्घाटन केल्याची ऐतिहासिक आठवण आजही ग्रामस्थ जपून आहेत.

विशेष म्हणजे, ही विहीर वर्षभर पाण्याने समृद्ध राहते. १९८२ च्या तीव्र दुष्काळातही या विहिरीतील पाण्याचा झरा अखंड सुरू राहिला होता. त्यामुळे या विहिरीला ऐतिहासिकतेबरोबरच जलसंपदेच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या ठिकाणाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन परिसराच्या सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. अक्कलकोटचे आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी तसेच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांना गती मिळत आहे. मात्र, प्रस्तावित आराखड्यातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याने शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे.
ऐतिहासिक विहिरीच्या परिसरात आकर्षक सुशोभीकरण, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, स्मृतीस्थळ विकास आणि वारसा संवर्धनाची कामे पूर्ण झाल्यास वळसंग हे ठिकाण राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकू शकते. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करून ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



