क्राईम

गोव्यातील समुद्रकिनारी काळाचा घाला; सोलापूरचे कंत्राटदार सतीश भोसले यांचे निधन

कुटुंबासमवेत पर्यटनासाठी गेले असताना घडली दुर्घटना; महापालिका वर्तुळात शोककळा

गोव्यातील समुद्रकिनारी काळाचा घाला; सोलापूरचे कंत्राटदार सतीश भोसले यांचे निधन

कुटुंबासमवेत पर्यटनासाठी गेले असताना घडली दुर्घटना; महापालिका वर्तुळात शोककळा

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील परिचित कंत्राटदार सतीश उद्धव भोसले (वय ५५, रा. जानकी नगर, जुळे सोलापूर) यांचे गोवा येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सोलापूर शहरासह बांधकाम क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

सतीश भोसले हे गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत होते. सोलापूर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर विविध शासकीय कामांमधील ते परिचित नाव होते. गंगेवाडी परिसरात त्यांचा वाळू, मुरूम आणि बांधकाम साहित्याचा मोठा व्यवसाय होता. व्यावसायिक यशासोबतच त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे त्यांनी अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश भोसले हे आपल्या कुटुंबीयांसमवेत गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना अचानक आलेल्या प्रचंड लाटेच्या तडाख्यात ते पाण्यात वाहून गेले. स्थानिकांनी आणि बचाव पथकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच सोलापूरमधील नातेवाईक, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली. मदतीला तत्पर धावून जाणारा, सर्वांना आपलेसे करणारा मित्र हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. सध्या गोवा येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर पार्थिव सोलापुरात आणण्यात येणार आहे. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

सतीश भोसले यांच्या अकाली जाण्याने सोलापूरच्या बांधकाम, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!