सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा चेहरा ठरला; राजेंद्र राऊतांना अधिकृत उमेदवारी
प्रशांत परिचारकांना डावलत भाजपचा राऊतांवर विश्वास; विधान परिषदेच्या रिंगणात बार्शीचे माजी आमदार
सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा चेहरा ठरला; राजेंद्र राऊतांना अधिकृत उमेदवारी
प्रशांत परिचारकांना डावलत भाजपचा राऊतांवर विश्वास; विधान परिषदेच्या रिंगणात बार्शीचे माजी आमदार
सोलापूर :- सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने अखेर आपल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा भाजपच्या केंद्रीय निवड समितीने विविध विधान परिषद मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राजेंद्र राऊत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य मतदान करणार असल्याने राजकीय समीकरणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आणि महायुतीचे संख्याबळ मजबूत असल्याने या जागेवर भाजपचा दावा सुरुवातीपासूनच भक्कम मानला जात होता.
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी माजी आमदार राजेंद्र राऊत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रशांत परिचारक यांच्या नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर संघटनात्मक कामगिरी, स्थानिक पातळीवरील प्रभाव आणि पक्षनिष्ठा या निकषांचा विचार करून भाजपने राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास दाखवला.

राजेंद्र राऊत यांनी बार्शी नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध स्थानिक संस्थांमधून नेतृत्वाची छाप पाडली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्यांशी त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे त्यांचे नाव आघाडीवर राहिले. त्यामुळेच विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत भाजपने त्यांना संधी दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
उमेदवारी जाहीर होताच सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला असून आगामी निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विद्यमान राजकीय गणित पाहता राजेंद्र राऊत यांची उमेदवारी भाजपसाठी फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार असून विरोधी पक्ष कोणती रणनीती आखतात याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



