क्राईम

तहसील कार्यालयात लाचखोरीचा सापळा; महसूल सहाय्यकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

जन्म-मृत्यू नोंद प्रकरणात आदेशासाठी २ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात कारवाई

तहसील कार्यालयात लाचखोरीचा सापळा; महसूल सहाय्यकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

जन्म-मृत्यू नोंद प्रकरणात आदेशासाठी २ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात कारवाई

पंढरपूर (प्रतिनिधी) :- जन्म-मृत्यू नोंदणीच्या प्रकरणात तहसीलदारांकडून लवकर आदेश मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि एका खासगी इसमाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलीफ शमशुद्दीन सुतार (वय २९), महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय पंढरपूर आणि मारुती ज्ञानोबा वाघमारे (वय ५०), रा. येड्राव, ता. मंगळवेढा यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदार हे वकिली व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या पक्षकारांच्या वतीने जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसील कार्यालयात दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये तहसीलदारांकडून लवकर सुनावणी घेऊन आदेश मिळवून देण्यासाठी आरोपींनी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे केली होती.

तक्रारीची पडताळणी २९ मे आणि १ जून रोजी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. सोमवारी (१ जून) करण्यात आलेल्या कारवाईत महसूल सहाय्यक अलीफ सुतार यांनी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, पोलीस निरीक्षक शैलेश पवार तसेच एसीबी सोलापूरच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एजंटकडून कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!