‘मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र’ हाऊसफुल! ग्रामविकास विभागाच्या सुविधांनी वारकऱ्यांची मने जिंकली
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धर्मपुरी पालखीतळावरील सुविधांची केली पाहणी; वारकऱ्यांसोबत जमिनीवर बसून घेतला प्रसाद, सेवा-सुविधांबाबत घेतला आढावा

‘मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र’ हाऊसफुल! ग्रामविकास विभागाच्या सुविधांनी वारकऱ्यांची मने जिंकली
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धर्मपुरी पालखीतळावरील सुविधांची केली पाहणी; वारकऱ्यांसोबत जमिनीवर बसून घेतला प्रसाद, सेवा-सुविधांबाबत घेतला आढावा
सोलापूर : आषाढी वारीनिमित्त ग्रामविकास व पंचायत राज विभागाने पालखी मार्गावर उभारलेल्या विविध सुविधा वारकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून, विशेषतः ‘मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्राला’ वारकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हजारो भाविकांनी या निवारा केंद्राचा लाभ घेतल्याने ते अक्षरशः ‘हाऊसफुल’ झाले आहे. निवारा, आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, मसाज सुविधा, मोबाईल चार्जिंग आणि हिरकणी कक्ष अशा सर्व सुविधांबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धर्मपुरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाला भेट देऊन तेथील सुविधा, व्यवस्था आणि वारकऱ्यांच्या अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख यांच्यासोबत चर्चा करून विविध सूचनाही जाणून घेतल्या. तसेच पालखी तळावर वारकरी भाविकांशी संवाद साधत त्यांच्या भावना आणि अपेक्षा समजून घेतल्या.

मंत्रीपदाचा कोणताही बडेजाव न करता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीसोबत पायी चालत कारुंडे बंगला येथे माऊलींच्या विसाव्याच्या ठिकाणी भेट दिली. तेथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत जमिनीवर मांडी घालून प्रसाद ग्रहण केला. त्यानंतर सोहळा प्रमुखांच्या कार्यालयातही जमिनीवर बसून पालखी सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि पुढील आवश्यकतेबाबत सविस्तर चर्चा केली.

या प्रसंगी अॅड. राजेंद्र उमाप यांनी संस्थानच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा महावस्त्र आणि प्रसाद देऊन सत्कार केला.
या भेटीदरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. अमृता वाघे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, मराठी चित्रपट अभिनेते भाऊ कदम, गटविकास अधिकारी पांढरे तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.

वारीदरम्यान पावसाचा सामना करणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामविकास विभागाच्या वतीने रेनकोटचे प्रातिनिधिक वाटप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पालखी सोहळा प्रमुखांचाही महावस्त्र व रेनकोट देऊन सन्मान करण्यात आला.
पालखी मार्गावरील वारकऱ्यांसाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाने शौचालये, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फूट मसाज मशीन, हिरकणी कक्ष, मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र (जर्मन हँगर), मुख्यमंत्री आरोग्य रथ, मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व सुविधांच्या व्यवस्थापनासाठी वारीदूत कार्यरत आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री आरोग्यदूत, मुख्यमंत्री वारीदूत आणि मुख्यमंत्री जलदूत ही अभिनव सेवा सुरू करण्यात आली आहे. गणवेशातील कर्मचारी वारकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत आवश्यक सेवा देत आहेत.
आरोग्यदूत मोटारसायकलवरून वैद्यकीय साहित्य घेऊन पालखी मार्गावर फिरत असून, गरज पडल्यास वारकऱ्यांवर जागेवरच उपचार करत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी कार्यकारी अभियंता संतोष काटकर आणि उपअभियंता रणजित काळे हे पुणे ते पंढरपूर या संपूर्ण मार्गावर समन्वय ठेवत आहेत.
आरोग्यदूतांच्या मोबाइल सेवेची आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी घाडगे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी हे आरोग्य सेवेचा समन्वय सांभाळत आहेत.
पालखी मार्गावरील मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हे वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळत असल्याने हजारो वारकरी येथे विसावा घेत आहेत. निवारा केंद्रात हिरकणी कक्ष, फूट मसाज सुविधा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या सुविधांची मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी पाहणी केली. तसेच पालखी पुढे गेल्यानंतर स्वच्छता आणि शौचालय व्यवस्थापनाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्या नियंत्रणाखाली पार पाडली जात असल्याची माहिती देण्यात आली.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाने उभारलेल्या या सर्वसमावेशक व्यवस्थेमुळे पालखी मार्गावरील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून, “वारीची सेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून प्रशासनाचे कार्य सुरू असल्याची भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली.



