भांडी मिळवण्यासाठी ‘दर’ ठरला… पण एसीबीने खेळ केला फेल!”

“भांडी मिळवण्यासाठी ‘दर’ ठरला… पण एसीबीने खेळ केला फेल!”
“५०० रुपयांच्या व्यवहाराने उघड केला भ्रष्टाचाराचा खेळ”
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात शासनाच्या मोफत योजनेत लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला असून, दोन खाजगी ऑपरेटरांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये विनोद विजय गाडेकर (वय ३७, ऑपरेटर, भांडी वाटप केंद्र, उपळाई बुद्रुक, ता. माढा) आणि दिनेश मनोहर वाघमारे (वय २३, ऑपरेटर, भांडी वाटप केंद्र, माळी वस्ती, उपळाई बुद्रुक, ता. माढा) यांचा समावेश आहे.
तक्रारदार हे बांधकाम कामगार असून त्यांनी २७ मार्च २०२६ रोजी शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या मोफत भांडी संचासाठी अर्ज केला होता. मात्र, ही सेवा मोफत असताना आरोपी क्र. १ विनोद गाडेकर यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला १२०० रुपयांची मागणी केली. पुढे “तडजोड” करत ही रक्कम ५०० रुपयांवर आणण्यात आली.
यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने १६ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सोलापूर येथे तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर एसीबीने त्याच दिवशी दोन पंचांच्या उपस्थितीत पडताळणी केली. त्यामध्ये ५०० रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ६ मे २०२६ रोजी सापळा रचण्यात आला.
महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयातील कार्यालयात आज सापळा टाकण्यात आला. आरोपी विनोद गाडेकर यांनी तक्रारदाराला लाच रक्कम आरोपी दिनेश वाघमारे यांच्याकडे देण्यास सांगितले.
तक्रारदाराने ५०० रुपये दिल्यानंतर वाघमारे यांनी पंचांसमक्ष लाच स्वीकारताच एसीबीने दोघांनाही रंगेहात पकडले.
दोन्ही आरोपींविरुद्ध माढा पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली
* शिरीष सरदेशपांडे – पोलीस उपायुक्त/अधीक्षक, एसीबी पुणे
* अजित पाटील – अपर पोलीस अधीक्षक, एसीबी पुणे
* प्रशांत चौगुले – पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर
* शैलेश पवार – पोलीस निरीक्षक, एसीबी सोलापूर
तसेच अंमलदार स्वागीराव जाधव, सलीम मुल्ला, अक्षय श्रीराम यांनीही कारवाईत सहभाग घेतला.
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचा एजंट कायदेशीर फी व्यतिरिक्त पैसे मागत असेल, तर त्वरित एसीबी सोलापूरशी संपर्क साधा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.
टोल फ्री: १०६४
व्हॉटसअॅप: ९४०४००१०६४
ही घटना स्पष्ट करते की, “मोफत योजना” नावाखाली लाच मागणाऱ्यांना आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.



