राजकारण

पवारांच्या नावाने सुरू झालेला संघर्ष आता मानेंच्या दारात!

एकेकाळचे विश्वासू सहकारी बाबासाहेब पाटील थेट दिलीपराव मानेंविरोधात मैदानात; सोसायटी निवडणुकीत रंगणार राजकीय संघर्ष

पवारांच्या नावाने सुरू झालेला संघर्ष आता मानेंच्या दारात!

एकेकाळचे विश्वासू सहकारी बाबासाहेब पाटील थेट दिलीपराव मानेंविरोधात मैदानात; सोसायटी निवडणुकीत रंगणार राजकीय संघर्ष

उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात माजी आमदार दिलीपराव माने यांच्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत सहकारी, मार्डीचे नेते बाबासाहेब पाटील यांनी आता थेट मानेंविरोधात सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा अर्ज मंजूर झाल्याने या राजकीय संघर्षाला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. एकेकाळी मानेंच्या नेतृत्वाखाली राजकारण करणारे पाटील आता त्यांच्याच विरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बाबासाहेब पाटील आणि दिलीपराव माने यांच्यातील राजकीय संबंध तब्बल दोन दशकांचे होते. माने यांच्या पाठबळावर बाबासाहेब पाटील यांनी मार्डी सोसायटीचे सलग २० वर्षे चेअरमनपद भूषविले. एवढेच नव्हे, तर पाटील यांच्या कुटुंबावरही माने यांनी विश्वास दाखवत त्यांच्या बंधूंना उत्तर सोलापूर तालुक्याच्या सभापतीपदाची संधी दिली होती.

मात्र, राजकीय प्रवासातील ही दीर्घकाळाची साथ आता संघर्षात बदलली आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय ताकद उभी राहिली, त्याच नेतृत्वाला निवडणुकीच्या मैदानात आव्हान देण्याची भूमिका बाबासाहेब पाटील यांनी घेतल्याने या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या संघर्षाची पार्श्वभूमी मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील घडामोडींमध्ये दडलेली आहे. बिबी-दारफळ जिल्हा परिषद गटातून भाजपचे नेते इंद्रजीत पवार यांना माजी आमदार दिलीप माने यांनी अंतर्गत सहकार्य केल्याचा आरोप त्यावेळी बाबासाहेब पाटील यांनी केला होता. यामुळे पाटील यांच्यात नाराजी निर्माण झाली होती.

मार्डीच्या स्थानिक राजकारणात पवार यांना विरोध असल्याने मानेंच्या भूमिकेशी असहमती दर्शवत पाटील यांनी त्यावेळी मानेंचे राजकीय विरोधक माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि काका साठे यांच्याशी जवळीक साधली होती. या घडामोडींमुळे माने-पाटील यांच्यातील राजकीय दुरावा वाढत गेल्याचे चित्र होते.

• ‘पवारांना विरोध’ की मानेंच्या नेतृत्वालाच आव्हान? •

त्यावेळी बाबासाहेब पाटील यांनी आपला विरोध स्थानिक राजकारणातील इंद्रजीत पवार यांच्यापुरता असल्याची भूमिका मांडली होती. मात्र, आता थेट दिलीपराव माने यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

माने यांनीही त्यावेळी बाबासाहेब पाटील यांच्या भूमिकेवर उपरोधिक टिप्पणी करत ‘ते आता मोठे नेते झाले आहेत,’ असा टोला लगावला होता. या जुन्या वक्तव्याची आठवण आता नव्याने चर्चेत आली आहे.

एकेकाळच्या निष्ठावंत सहकाऱ्याने थेट विरोधात उमेदवारी दाखल केल्याने ही लढत केवळ सोसायटी निवडणुकीपुरती मर्यादित राहिलेली नाही. मानेंच्या राजकीय प्रभावाला त्यांच्या परिचित वर्तुळातूनच आव्हान मिळत असल्याने या संघर्षाकडे संपूर्ण उत्तर सोलापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बाबासाहेब पाटील यांची ही भूमिका कितपत प्रभावी ठरणार, मानेंच्या समर्थकांची भूमिका काय राहणार आणि या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. एकेकाळच्या गुरु-शिष्याच्या राजकीय नात्यात निर्माण झालेला हा संघर्ष आगामी काळात उत्तर सोलापूर तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!