कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद; जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा सामाजिक उपक्रम!
सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना दिवाळी शिध्याचे वाटप; कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा सन्मान

·
कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद; जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा सामाजिक उपक्रम!
सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना दिवाळी शिध्याचे वाटप; कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा सन्मान
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची दिवाळी गोड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या सोलापूर शाखेच्या वतीने यंदाही दिवाळीनिमित्त शिध्याचे वाटप करण्यात आले. सालाबादप्रमाणे राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करत त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, या भावनेतून पुरेशा प्रमाणात दिवाळी शिधा देण्यात आला. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

दिवाळी शिधा वाटप कार्यक्रम उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) सूर्यकांत भुजबळ, महिला व बाल विकास जिल्हा मोहीम अधिकारी प्रसाद मिरकले आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या शुभहस्ते पार पडला.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कार्यालयीन परिसर स्वच्छ ठेवण्यापासून ते सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यापर्यंत हे कर्मचारी सातत्याने आपली सेवा बजावत असतात. त्यांच्या या योगदानाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणात त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही आनंदाचा क्षण अनुभवता यावा, या सामाजिक बांधिलकीतून कर्मचारी युनियनने हा उपक्रम राबविला.

यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे विभागीय संघटक डॉ. शत्रुघ्न माने, जिल्हाध्यक्ष दयानंद परिचारक, सचिव त्रिमूर्ती राऊत, कोषाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष विशाल घोगरे, मुख्य सल्लागार श्रीशैल्य देशमुख, मुख्य संघटक योगेश हब्बु, सहसचिव इरण्णा भरडे, जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्र. १ चे संचालक श्रीधर कलशेट्टी, एस. डी. म्हमाणे, वरिष्ठ सहाय्यक लेखा उमेश खंडागळे, रेवण म्हेत्रे आदी उपस्थित होते.

“कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी राहणे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, हीच कर्मचारी युनियनची सामाजिक बांधिलकी आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी युनियनच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी स्वागत केले. आपल्या कष्टांची दखल घेऊन सणासुदीच्या काळात आनंदाची भेट दिल्याबद्दल त्यांनी कर्मचारी युनियनचे आभार मानले. सामाजिक जाणीव आणि कर्मचारी हित जपणारा हा उपक्रम जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करणारा ठरला.



