सोलापूर

जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्ह्यात कोठेही सक्तीने कर्जवसुली होत असल्यास तात्काळ तालुका सहाय्यक निबंधकांशी संपर्क साधावा

जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी –
जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्ह्यात कोठेही सक्तीने कर्जवसुली होत असल्यास तात्काळ तालुका सहाय्यक निबंधकांशी संपर्क साधावा

अवैध सावकारीविरोधात पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे चार जणांच्या घरांची झडती

सोलापूर, दि. ३ (जिमाका) : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खाजगी सावकारांनी शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर दिलेले होते. तरीही जिल्ह्यात खाजगी सावकारांकडून धमकी देऊन किंवा बळाचा वापर करून कर्जवसुली केली जात असल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्यावर कर्जवसुलीसाठी कोणताही अनुचित दबाव आणला जाऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था मुकुंद पवार यांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये तालुका सहाय्यक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथकांची स्थापना केली आहे. या पथकांमध्ये सहकार विभागातील अन्य अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. खाजगी सावकारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये आणि अवैध सावकारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या पथकांमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.

• सोनके येथे चार जणांच्या घरांची झडती •

अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने पंढरपूर तालुक्यातील मौजे सोनके येथे दि. २ नोव्हेंबर रोजी कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम, २०१४ मधील कलम १६ अन्वये करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान सागर जनार्दन कोळेकर, सचिन मारुती पाटील (खरात), रणजित आजिनाथ कोळेकर आणि महेश गलांडे या सोनके येथील चार रहिवाशांच्या घरांची झडती घेण्यात आली.

• तक्रार करण्याचे आवाहन •

जिल्ह्यात कुठेही अवैध सावकारी होत असल्याची माहिती किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी संबंधित तालुक्याच्या सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. अवैध सावकारीला बळी पडू नये तसेच सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले आहे.

******

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!