महाराष्ट्र

पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी ४१५० कोटींचा भव्य विकास आराखडा मंजूर

पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी ४१५० कोटींचा भव्य विकास आराखडा मंजूर

फडणवीसांचा मोठा निर्णय – ३० महिन्यांत बदलणार पंढरपूरचे रूप

पंढरपूर (प्रतिनिधी):- राज्यातील प्रमुख धार्मिक केंद्र असलेल्या पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत तब्बल ४१५०.४६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पंढरपूरच्या पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांसाठीच्या सोयीसुविधांमध्ये मोठा बदल अपेक्षित आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वने मंत्री गणेश नाईक, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान अवताडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंढरपूरचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांचा विचार करून विकासकामे नियोजनबद्ध रितीने राबविण्याचे निर्देश दिले. तसेच मंजूर आराखड्यातील सर्व कामे येणाऱ्या ३० महिन्यांत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.

पंढरपूर येथे वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने वाढती गर्दी, वाहतूक कोंडी आणि अपुरी सुविधा या समस्या लक्षात घेऊन हा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी एस.
कार्तिकेयन यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार गर्दी नियंत्रणासाठी विशेष कॉरिडॉर, प्राचीन मंदिर व मठांचे जतन-संवर्धन आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारणीसाठी ७३५.८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

तसेच नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास, नदी घाटांचे सुशोभीकरण, वाहनतळ व व्यापारी संकुल उभारणी, शहर सौंदर्यीकरण, नवीन रस्ते व पूल बांधकाम आणि पालखी तळांच्या विकासासाठी १३८७.९१ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

याशिवाय भूसंपादन, पुनर्वसन आणि बाधितांना योग्य मोबदला देण्यासाठी २०२६.७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बाधित नागरिक व व्यावसायिकांना योग्य मोबदला तातडीने देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

हा विकास आराखडा पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर हे केवळ धार्मिक नव्हे तर नियोजित आणि आधुनिक सुविधा असलेले जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!