जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूरमध्ये १६.३५ कोटींचे VVIP विश्रामगृह; धार्मिक पर्यटनाला नवी दिशा

जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूरमध्ये १६.३५ कोटींचे VVIP विश्रामगृह; धार्मिक पर्यटनाला नवी दिशा
तुळजापूर (प्रतिनिधी):- साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी नगरीत धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने मोठी भर पडणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत ४३८ कोटी रुपयांच्या कामांची निविदा जाहीर झाल्यानंतर आता तुळजापूरमध्ये ‘VVIP शासकीय विश्रामगृह’ उभारणीस उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी १६ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेले शासकीय विश्रामगृह हे १९६७ साली बांधण्यात आलेले असून जवळपास ५९ वर्षे जुने आहे. वाढत्या भाविकांची संख्या आणि देशभरातून येणाऱ्या मान्यवरांच्या निवासाची गरज लक्षात घेता ही इमारत अपुरी व जीर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर प्रशस्त, आधुनिक आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला.
या संदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवून दिल्याचे सांगितले. त्यांच्या मते, तुळजापूरचा धार्मिक आणि पर्यटन क्षेत्रातील लौकिक वाढत असून आगामी काळात देश-विदेशातील पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या सुविधांची उभारणी आवश्यक होती.
*कसे असेल नवीन विश्रामगृह?*
नवीन विश्रामगृह ‘जी प्लस टू’ (तळमजला + दोन मजले) या स्वरूपात आरसीसी फ्रेम स्ट्रक्चरमध्ये उभारले जाणार आहे.
* एकूण बांधकाम क्षेत्र : ३,१६८ चौ.मी. (३४,१०० चौ.फूट)
* एकूण भूखंड क्षेत्र : १,१८,९२० चौ.फूट
* ठिकाण : सिटी सर्व्हे क्र. ९०२ (सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा)
सध्या या जागेवर तीन जुनी व जीर्ण इमारती असून त्या पाडून नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संपूर्ण बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.
*मजल्यानुसार सुविधा*
* तळमजला
* ४ व्हीआयपी सूट
* प्रशस्त मीटिंग हॉल
* डायनिंग हॉल व सुसज्ज किचन
* चालकांसाठी स्वतंत्र निवास कक्ष
*पहिला मजला*
२ व्हीव्हीआयपी सूट
२ सेमी व्हीआयपी सूट
*दुसरा मजला*
२ व्हीव्हीआयपी सूट
२ सेमी व्हीआयपी सूट
इमारतीचे नकाशे वास्तुशास्त्रज्ञांकडून तयार करण्यात आले असून उपमुख्य वास्तुविशारदांची तत्वतः मान्यता प्राप्त झाली आहे.
*धार्मिक पर्यटनाला नवी चालना*
महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात. आगामी काळात तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नवीन VVIP विश्रामगृहामुळे देशभरातील अतिमहत्त्वाच्या मान्यवरांच्या निवासाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असून तुळजापूरच्या विकासात हा आणखी एक मानाचा तुरा ठरणार आहे.



