शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती! ‘एआय फॉर ॲग्री २०२६’ परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती! ‘एआय फॉर ॲग्री २०२६’ परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील शेतकऱ्यांनी डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर करून शेती अधिक आधुनिक व नफ्याची करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध डिजिटल ॲप्समुळे शेतकरी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधून शेतीविषयक प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळवू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘AI for Agri 2026’ अर्थात ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’चे उद्घाटन मुंबईतील Jio World Convention Centre येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. ही परिषद ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ अंतर्गत आयोजित करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने ‘महा-एआय इनोव्हेशन सेंटर’च्या माध्यमातून विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्र यांना एकत्र आणून डिजिटल सक्षम परिसंस्था उभारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव यांची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे.

*एआय आधारित ॲप्सचे लोकार्पण*
या परिषदेत कृषी क्षेत्रासाठी विकसित करण्यात आलेल्या एआय आधारित महत्त्वपूर्ण ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचे लोकार्पण करण्यात आले. या ॲप्समुळे पीकनिहाय सल्ला, रोगनिदान, उत्पादन वाढविण्याचे तंत्र, तसेच थेट बाजारपेठेची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत उपलब्ध होणार आहे.
या वेळी ‘वन स्टेप फाउंडेशन’ आणि World Bank यांच्यातील महत्त्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे राज्यातील कृषी क्षेत्रात तांत्रिक गुंतवणूक आणि नवसंशोधनाला चालना मिळणार आहे.
*देशातील पहिले राज्य*
शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आयोजित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचा सर्वसमावेशक विकास करण्यावर शासनाचा भर असून, डिजिटल शेती हीच भविष्यातील दिशा असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले.

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे शेती क्षेत्रात डिजिटल क्रांती घडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, जोखीम कमी करणे आणि जीवनमान उंचावणे शक्य होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.



