सोलापूर

परिक्षेच्या आदल्या दिवशीच मिळाली एंन्ट्री; शिक्षणाधिकारी जगताप यांच्या निर्णयाने स्काॅलर मुलाचे वर्ष वाचले

परिक्षेच्या आदल्या दिवशीच मिळाली एंन्ट्री; शिक्षणाधिकारी जगताप यांच्या निर्णयाने स्काॅलर मुलाचे वर्ष वाचले

सोलापूर (प्रतिनिधी):- शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी. मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशीच फॉर्म भरला नसल्याचे समजल्याने एका स्कॉलर विद्यार्थ्याच्या आयुष्यात मोठा धक्का बसला. पण योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची संधी मिळाली.

ही घटना सोमवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेपूर्वी घडली. संदेश महादेव कापसे हा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी कोल्हापूर येथे गेला होता. तो मूळ गावातीलच शाळेत शिक्षण घेत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहे. आई नसल्यामुळे आणि वडील कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षकांनी सांभाळली होती.

परीक्षेसाठी एक दिवस आधी तो गावी परतल्यानंतर त्याला आपल्या परीक्षेचा फॉर्मच भरलेला नसल्याचे समजले. ही बाब समजताच तो पूर्णपणे खचला. एका कोपऱ्यात जाऊन बसलेल्या संदेशच्या डोळ्यात अश्रू होते आणि महिन्यांच्या परिश्रमावर पाणी फिरल्याची भावना होती.

विद्यार्थ्याच्या शिक्षकांनी तातडीने तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र “आता काही होण्याची शक्यता 99.99% नाही” असे उत्तर मिळाले. तरीही त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून सचिन जगताप यांना संपर्क साधला.

शिक्षकांनी संपूर्ण परिस्थिती शांतपणे सांगितल्यानंतर जगताप यांनी तातडीने प्रतिसाद देत, “मी पुण्याला फोन करून विचारतो. शक्य असेल तर रात्री 8 वाजता कळवतो,” असे सांगितले.

ठरल्याप्रमाणे रात्री 8 वाजता जगताप यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, ‘सुपर लेट फी’ भरून फॉर्म स्वीकारला जाऊ शकतो. तातडीने प्रक्रिया पूर्ण करा आणि विद्यार्थ्याला परीक्षेसाठी पाठवा. त्याला माझ्या शुभेच्छा सांगा.’

हा फोन म्हणजे त्या विद्यार्थ्यासाठी नवजीवन देणारा क्षण होता. शिक्षकांनी तत्काळ प्रक्रिया पूर्ण केली आणि संदेशला परीक्षेला बसण्याची संधी मिळाली.

*शिक्षण व्यवस्थेवर वाढला विश्वास*

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एका गरजवंत, होतकरू विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतल्याबद्दल शिक्षकांनी शिक्षणाधिकारी जगताप यांचे आभार मानले. या घटनेमुळे शिक्षण विभागातील सकारात्मकता अधोरेखित झाली असून, इतर शिक्षकांमध्येही “प्रामाणिक प्रयत्न केल्यास मार्ग नक्की निघतो” असा विश्वास निर्माण झाला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही घटना प्रेरणादायी ठरली आहे. एका अधिकाऱ्याच्या संवेदनशीलतेमुळे एका विद्यार्थ्याचे शैक्षणिक स्वप्न तुटण्यापासून वाचले—आणि शिक्षण व्यवस्थेतील मानवतेचा चेहरा पुन्हा एकदा उजळून निघाला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!