पहाटेचा काळा क्षण! सोलापुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

पहाटेचा काळा क्षण! सोलापुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत तीन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रूपा भवानी मंदिराजवळ, सिद्धेश्वर वुमन्स पॉलीटेक्निक कॉलेजसमोर घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिघे मित्र बर्गमन स्कूटर (MH-13-ER-0627) वरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही युवक रस्त्यावर दूर फेकले गेले, तर दुचाकी काही अंतरावर जाऊन पडली. अपघाताच्या तीव्रतेमुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
मृतांची नावे :
नागेश प्रकाश गवंडी (२७) – रविवार पेठ
रोहन अशोक कोरे (२३) – श्रीशैल नगर, भवानी पेठ
बसवराज सुनील चनशेट्टी (२५) – शेळगी, सोलापूर
घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तिघांना तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिघांना मृत घोषित केले.
नागेश गवंडी हे टोलनाक्यावर नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात आई, बहीण आणि एक भाऊ आहे.
रोहन कोरे फायनान्स क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि विवाहित बहीण आहे.
बसवराज चनशेट्टी पुण्यातील बजाज फायनान्समध्ये काम करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नातेवाईक आणि मित्रांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, अपघात घडवून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.



