मोडनिंबजवळ भीषण अपघात; कठड्याला धडक देत कार खड्ड्यात, तरुणाचा जागीच मृत्यू

मोडनिंबजवळ भीषण अपघात; कठड्याला धडक देत कार खड्ड्यात, तरुणाचा जागीच मृत्यू
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोडनिंब येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील कारने रस्त्यालगतच्या लोखंडी कठड्यास जोरदार धडक दिल्यानंतर सलग तीन ते चार पलट्या मारत खड्ड्यात जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात घडला.
ही दुर्घटना पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास मोडनिंब येथील ओंकार पॅलेस हॉटेलजवळ घडली. या अपघातात रोहित अण्णासाहेब पाटील (वय ३३, रा. शेळगी, सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. ते क्रेटा कार (एमएच १३ ई एक्स १२९७) चालवत होते.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कार अतिवेगात असताना चालकाचा ताबा सुटला आणि वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्यास जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की कारने सलग तीन ते चार पलट्या घेतल्या आणि अखेरीस रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात जाऊन थांबली. या अपघातात चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचे सर्व दरवाजे लॉक झाल्याने चालक वाहनातच अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने कारचे दरवाजे कापून चालकाचा मृतदेह बाहेर काढला.

या भीषण अपघातामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महामार्ग पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.


