क्राईम

मंत्रालयात एसीबीचा सापळा; लाच स्वीकारताना कर्मचारी रंगेहाथ जाळ्यात, खळबळ उडाली

मंत्रालयात एसीबीचा सापळा; लाच स्वीकारताना कर्मचारी रंगेहाथ जाळ्यात, खळबळ उडाली

मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रालयात अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) केलेल्या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. निलंबित मेडिकल परवाना पूर्ववत करून देण्यासाठी संबंधित क्लर्कने ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर झालेल्या या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

एसीबीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर सहा अधिकाऱ्यांचे विशेष पथक मंत्रालयात दाखल झाले. संबंधित प्रकरणाची पडताळणी करून कारवाईदरम्यान मंत्री नरहरी शिरवळ यांच्या कार्यालय परिसरावर तात्पुरता ताबा घेण्यात आला. तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपी क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी नेण्यात आले.

या कारवाईनंतर मंत्रालयात विविध चर्चांना उधाण आले असून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला. मंत्रालयातच एसीबीला सापळा रचावा लागणे ही गंभीर बाब असून प्रशासनात लाचखोरी व कमिशनखोरी वाढल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेची कामे पैशाशिवाय होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, एसीबीकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून लाचखोरी प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!