‘सेवाकर्मी’ गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल; उत्कृष्ट कामगिरीबद्दल भव्य सत्कार सोहळा
‘सेवाकर्मी’ गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल; उत्कृष्ट कामगिरीबद्दल भव्य सत्कार सोहळा
सोलापूर (प्रतिनिधी):- राज्य शासनाच्या ‘सेवाकर्मी’ कार्यक्रमाच्या गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. प्रशासनातील पारदर्शकता, काटेकोर नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे जिल्हा परिषदेने सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत आपली प्रशासकीय गुणवत्ता सिद्ध केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
‘सेवाकर्मी’ कार्यक्रमाच्या मूल्यमापनामध्ये सर्व संवर्गांची अद्ययावत ज्येष्ठता सूची, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, सरळसेवा नियुक्ती, रिक्त पदांची अद्ययावत माहिती, बिंदूनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया, आय-गोट पोर्टलवरील १०० टक्के नोंदणी तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचे अद्ययावत करणे या सर्व बाबींमध्ये सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.
या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुलदीप जंगम यांचा महिला कर्मचारी वर्गाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील यांचा पुरुष कर्मचारी बांधवांच्या वतीने सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
या गौरव सोहळ्यास मा. कुलदीप जंगम (मुख्य कार्यकारी अधिकारी), श्री. चंद्रशेखर जगताप (प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), श्रीमती स्मिता पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी – प्रशासन), श्रीमती मीनाक्षी वाकडे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी), श्री. संतोष कुलकर्णी (कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार कर्मचारी बांधवांच्या वतीने करण्यात आला.
*अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव*
या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुलदीप जंगम यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये अविनाश गोडसे, सचिन साळुंखे, हनुमंत गायकवाड, श्रीधर कलशेट्टी, वैशाली रामपुरे, ममता काशेट्टी, नरेंद्र अकेले, महेश केंद्रे, शिवाजी राठोड, अरविंदकुमार सोनवणे, प्रदीप सगट, रामचंद्र गुरव, अर्चना निराळी, अश्विनी मुळीक, विजय पाटील, प्रतीक्षा कांबळे, नरसिंह गायकवाड, मनोज वडगावे, बसवराज भेंडी, जनबसव्वा, कल्याण अक्षय सोनकांबळे, वैशाली शिंदे, शाहू गायकवाड, लक्ष्मी शिंदे, संजय गौडगाव, वीरपक्षया स्वामी, अंजली पेठकर, श्रीदेवी महामुरे, साहेबराव देशमुख, बसवराज स्वामी, विक्रम शहा, रवी करजगी, पद्माकर बनसोडे, लक्ष्मण झिपरे, महेंद्र माने, रेवणसिद्ध म्हेत्रे आदी कर्मचारी बांधवांचा समावेश होता.
*यशामागील प्रमुख घटक*
महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे नाव प्रथम क्रमांकावर झळकल्याने संपूर्ण जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. प्रशासनातील पारदर्शकता, काटेकोर नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अधिकारी-कर्मचारी वर्गाची एकजूट हे या यशामागील प्रमुख घटक ठरले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, सचिन साळुंखे व सर्व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले, तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन महताब शेख यांनी केले.



