“कायदा रक्षकच लाचखोर? मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एपीआय अडकला ६ लाखांच्या सापळ्यात”
“कायदा रक्षकच लाचखोर? मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एपीआय अडकला ६ लाखांच्या सापळ्यात”
सांगली (प्रतिनिधी):- कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांना तब्बल ६ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे संपूर्ण सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका नागरिकाविरोधातील हद्दपार प्रस्ताव रद्द करून देण्यासाठी सुनील गुरव यांनी सुरुवातीला ८ लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र तक्रारदाराने रक्कम जास्त असल्याचे सांगत तडजोड केली आणि अखेर ६ लाख रुपयांवर सौदा ठरला.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली. तक्रारीची प्राथमिक खात्री झाल्यानंतर ACB पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. ठरल्याप्रमाणे मिरज परिसरात सापळा लावण्यात आला आणि सुनील गुरव यांनी लाच स्वीकारताच पथकाने तत्काळ कारवाई करत त्यांना रंगेहाथ अटक केली.
या प्रकरणी सुनील गुरव यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू आहे. चौकशीत आणखी कोण सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
पोलीस दलातीलच अधिकाऱ्याचा असा प्रकार उघडकीस आल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, “कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांवरच विश्वास ठेवायचा तरी कसा?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अंतर्गत चौकशीचे संकेत देण्यात आले असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील ही घटना भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात एक मोठा धक्का मानली जात आहे.


