महाराष्ट्र

“दस्तऐवज नोंदणी प्रक्रिया बदलणार! मुख्य सचिव राजेश अग्रवालांच्या भेटीनंतर हालचालींना वेग”

“दस्तऐवज नोंदणी प्रक्रिया बदलणार! मुख्य सचिव राजेश अग्रवालांच्या भेटीनंतर हालचालींना वेग”

मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होण्याचे संकेत मिळाले असून, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा सखोल आणि सर्वंकष आढावा घेतला. या भेटीदरम्यान प्रशासकीय कामकाजापासून ते नागरिक सेवांपर्यंत प्रत्येक बाबींची तपशीलवार माहिती त्यांनी घेतली.

आढावा बैठकीत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, दस्तऐवज नोंदणीची सध्याची प्रक्रिया, संगणकीकरणाची स्थिती, ऑनलाईन सुविधांची अंमलबजावणी तसेच तक्रार निवारण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि कालबद्ध करण्यासाठी तातडीने सुधारणा राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

विशेषतः नागरिकांना कार्यालयात येताना होणारा वेळेचा अपव्यय कमी करणे, ऑनलाईन प्रणाली अधिक प्रभावी करणे आणि तक्रारींचे वेळेत निराकरण होईल अशी यंत्रणा मजबूत करण्यावर भर देण्यात आला. भविष्यातील वाढत्या कामाचा विचार करून तांत्रिक सुधारणा आणि मनुष्यबळ नियोजनावरही चर्चा झाली.

यानंतर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नव्या प्रशासकीय इमारतीच्या शेजारी उभारण्यात येत असलेल्या नोंदणी भवनाची प्रत्यक्ष पाहणी केली. या इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती, नागरिकांसाठी असणाऱ्या सुविधा, प्रशस्त प्रतीक्षालय, पार्किंग व्यवस्था तसेच आधुनिक पायाभूत सुविधांचा आढावा त्यांनी घेतला. बांधकामाचे काम निश्चित कालमर्यादेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीस जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे, सह नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक राजेंद्र मुठे यांच्यासह विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागासमोरील अडचणी, भविष्यातील गरजा आणि सुधारणा योजनांवर सखोल चर्चा झाली.

मुख्य सचिवांच्या या आढावा बैठकीनंतर नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यपद्धतीत लवकरच मोठे बदल दिसून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, याचा थेट फायदा नागरिकांना होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!