महावितरणचा सहायक अभियंता ३ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; सोलापूरमध्ये सापळा कारवाई
महावितरणचा सहायक अभियंता ३ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; सोलापूरमध्ये सापळा कारवाई
सोलापूर (प्रतिनिधी):- घरावरील सोलार सिस्टीमच्या ऑनलाईन अर्जास मंजुरी देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी महावितरणच्या जुळे सोलापूर शाखेतील सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) राबविलेल्या सापळा कारवाईत ३,००० रुपये लाच स्वीकारताना लोकसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव श्री. अमित विलासराव रेडेकर (वय ४२) असे असून ते महावितरण शाखा कार्यालय, जुळे सोलापूर येथे सहायक अभियंता (वर्ग–२) या पदावर कार्यरत आहेत.
तक्रारदार हे ग्राहकांच्या मागणीनुसार घरांवर सोलार सिस्टीम बसविण्याचे काम करतात. जुळे सोलापूर येथील एका ग्राहकाच्या घरावर ३.५ किलोवॅट क्षमतेची सोलार सिस्टीम बसविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला होता. सदर अर्जास मंजुरी देण्याची जबाबदारी सहायक अभियंता अमित रेडेकर यांच्याकडे होती.
मात्र, प्रति किलोवॅट १,००० रुपये या प्रमाणे तीन किलोवॅटसाठी ३,००० रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
या संदर्भात तक्रारदाराने दि. २३ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ACB पथकाने पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सापळा रचण्यात आला असता, आरोपी लोकसेवकाने तक्रारदाराकडून ३,००० रुपये लाच स्वतः स्वीकारली, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील (एसीबी, पुणे परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक शैलेश पवार, तर तपास अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (ACB, सोलापूर) काम पाहत आहेत.
कोणताही लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने काम करणारा एजंट शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACB सोलापूरकडून करण्यात आले आहे.
📞 टोल फ्री क्रमांक : 1064
व्हॉट्सॲप : 9404001064
संकेतस्थळ : acbmaharashtra.gov.in
ई-मेल : dyspacbsolapur@gmail.com



