एमबी नोंदीसाठी लाचखोरीची मागणी; नगर अभियंता एसीबीच्या जाळ्यात
एमबी नोंदीसाठी लाचखोरीची मागणी; नगर अभियंता एसीबीच्या जाळ्यात
कोल्हापूर (प्रतिनिधी ):- मुरगूड नगरपरिषदेतील विकासकामांची मोजणी व बिले मंजूर करण्यासाठी लाचखोरीचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, मुरगूड नगरपरिषदेतील नगर अभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. एमबी नोंदी पूर्ण करून देणे व प्रलंबित बिलाला मंजुरी देण्यासाठी लाच स्वीकारताना अभियंत्यास रंगेहाथ पकडण्यात आले.
प्रदीप पांडुरंग देसाई (वय ३२, रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. तो यापूर्वी हुपरी नगरपरिषदेत कार्यरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा शासकीय कंत्राटदार असून त्याने हुपरी नगरपरिषद हद्दीत रस्त्याची कामे पूर्ण केली होती. या कामाचे सुमारे ७० लाख रुपयांचे बिल मंजुरीअभावी प्रलंबित होते. संशयित अभियंता देसाई याने एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्यासाठी व बिल मंजूर करण्यासाठी सुरुवातीला दीड लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
नंतर दोघांमध्ये तडजोड होऊन १ लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले. यापैकी ५० हजार रुपये आधीच देण्यात आले होते. उर्वरित रकमेतील ४० हजार रुपये देण्यासाठी सोमवार (दि. १९) रोजी वेळ ठरवण्यात आली होती.
या लाच मागणीला कंटाळून कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला.
सोमवारी सायंकाळी मुरगूड येथील एसटी स्टँड परिसरात मोठ्या वर्दळीचा फायदा घेत कारवाई करण्यात आली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने अभियंता देसाईच्या कारमध्ये जाऊन लाचेची रक्कम दिली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने तात्काळ धडक देत अभियंत्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे मुरगूड व हुपरी नगरपरिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


