क्राईम

सोलार प्रकल्प चोरीचा पर्दाफाश; सोलापूर तालुका पोलिसांच्या कारवाईत १०.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलार प्रकल्प चोरीचा पर्दाफाश; सोलापूर तालुका पोलिसांच्या कारवाईत १०.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर (प्रतिनिधी):- उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी परिसरात कार्यरत असलेल्या सोलार प्रकल्पावर झालेल्या मोठ्या चोरीप्रकरणी सोलापूर तालुका पोलिसांनी प्रभावी तपास करत गुन्ह्याचा उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १० लाख ७८ हजार १३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. याशिवाय या चोरीमध्ये दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

मौजे कौठाळी ते वैराग रोडलगत पुरुषोत्तम प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत सोलार प्लेटच्या सहाय्याने वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या कॅबिनसमोर ठेवण्यात आलेले सोलार प्लेट व पॅनल स्ट्रक्चर अँगल असा ८ लाख ७८ हजार १९० रुपये किमतीचा साहित्य अज्ञात चोरट्यांनी २३ नोव्हेंबर २०२५ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत चोरून नेल्याचे उघड झाले होते.

या प्रकरणी आदित्य भाऊसाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस नाईक अनंत चमके व पथकाने कौठाळी परिसरात सापळा रचत शोधमोहीम राबवली. यावेळी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला दिशाभूल करणारी उत्तरे देणाऱ्या आरोपींनी सखोल चौकशीनंतर चोरीची कबुली दिली.

तपासादरम्यान पोलिसांनी चोरीसाठी वापरण्यात आलेले अशोक लेलँड ‘दोस्त’ मालवाहू वाहन (अंदाजे किंमत २ लाख रुपये),१०२ सोलार प्लेट (७.६५ लाख रुपये),१४७ नग धातूचे सोलार पॅनल स्ट्रक्चर अँगल (१.१३ लाख रुपये) असा एकूण १०.७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर व परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पो.हवा. राहुल महिंद्रकर, पोना. अनंत चमके, पोना. लालसिंग राठोड, पोको. पैंगबर नदाफ, वैभव सूर्यवंशी व सागर शिवे यांनी विशेष योगदान दिले.

दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक अनंत चमके करीत आहेत.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!