दावोसहून महाराष्ट्रासाठी धक्कादायक गूडन्यूज; रु १ लाख कोटींचा करार नेमका कोणासोबत?

दावोसहून महाराष्ट्रासाठी धक्कादायक गूडन्यूज; रु १ लाख कोटींचा करार नेमका कोणासोबत?
दावोस (स्वित्झर्लंड) :- जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस येथे असलेल्या महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन व लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या कराराअंतर्गत आयटी व आयटीईएस (IT/ITes) – डेटा सेंटर्स क्षेत्रात तब्बल ₹१,००,००० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून, यामधून सुमारे १.५० लाख थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र डेटा सेंटर्स व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात आघाडीवर येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सदर करारावर स्वाक्षरी करताना लोढा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक लोढा हे उपस्थित होते. या गुंतवणुकीमुळे राज्यात आधुनिक तंत्रज्ञानाधारित पायाभूत सुविधा उभ्या राहणार असून, तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून आयटी, डेटा सेंटर्स व डिजिटल क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण उपलब्ध आहे. अशा मोठ्या गुंतवणुकीमुळे राज्याची आर्थिक ताकद वाढण्यासोबतच जागतिक पातळीवर महाराष्ट्राची ओळख अधिक मजबूत होईल.
दावोस येथील या सामंजस्य कराराकडे राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.



