वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात टाळता येतील – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
३७ व्या जिल्हा रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन; ‘जीवनदीप’ पुरस्काराने जीवनदूतांचा गौरव

सोलापूर (प्रतिनिधी):- राज्यात विशेषतः महाराष्ट्र व तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण देशात सर्वाधिक असून, या अपघातांमध्ये मानवी निष्काळजीपणा तसेच तांत्रिक त्रुटी या प्रमुख कारणांचा समावेश असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. सर्व वाहनचालकांनी परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकते, असे आवाहन त्यांनी केले.

नियोजन भवन, सोलापूर येथे आयोजित ३७ व्या जिल्हा रस्ता सुरक्षा अभियान २०२६ चे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, शहर पोलीस उपायुक्त गौहर हसन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, अमरसिंह गवारे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलाणी, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनांचे पदाधिकारी, रिक्षा चालक-मालक संघटनांचे प्रतिनिधी तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले की, सोलापूर शहरात दुचाकी चालवताना अनेक वाहनचालक हेल्मेटचा वापर करत नसल्याचे दिसून येते. अतिवेग, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे, वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणे या सवयी अपघातांना आमंत्रण देतात. विशेषतः तरुण वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम स्वतः पाळण्यासोबतच आपल्या कुटुंबातील व संपर्कातील इतर व्यक्तींनाही नियम पाळण्यासाठी प्रवृत्त करावे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी रस्ते अपघातांची कारणे व आकडेवारी सादर केली. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचा अपघातातील मृत्यूदर अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. वेगमर्यादा पाळणे, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. १३ जानेवारी हा दिवस देशभरात रस्ता सुरक्षा अभियान म्हणून साजरा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार यांनी रस्त्यांची रचना, स्थिती, फलक व वळणे यांचा अभ्यास करून वाहन चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे मत व्यक्त केले. रस्त्यांचे बांधकाम परिस्थितीनुसार केलेले असते, त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात रस्ते अपघातात जखमी नागरिकांना तत्काळ मदत करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या ‘जीवनदूत’ ठरलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘जीवनदीप पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी, प्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी तसेच समाजातील जबाबदार नागरिकांचा समावेश होता.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सोलापूर, प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ३७ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन यावेळी औपचारिकरित्या करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले.

More Stories
सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर
अक्षता सोहळ्यानंतर मंदिर परिसर झळाळला; जयोस्तुते फाउंडेशनच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत कर्तुत्ववान मातांचा सन्मान, ६६ जणांचे रक्तदान