मिरजमधील खून प्रकरणात १५ जणांवर मोक्का; संघटित गुन्हेगारी टोळीचा कणा मोडला
मिरजमधील खून प्रकरणात १५ जणांवर मोक्का; संघटित गुन्हेगारी टोळीचा कणा मोडला
मिरज (प्रतिनिधी) :- मिरज शहरातील निखिल विलास कलगुटगी यांच्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील १५ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाईस मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मंजुरी दिली आहे. या कारवाईमुळे मिरज शहरातील संघटित गुन्हेगारी टोळीचा कणा मोडला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे.
मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. ३८७/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १११(२)(अ), १०३(१), १८९, १९०, ६१(२), आर्म अॅक्ट कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१),(३)/१३५ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा (मिरज उपविभाग) करीत होते.
*२०१७ पासून गुन्हेगारीचा इतिहास*
तपासात उघडकीस आले की, आरोपी टोळी प्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे (वय २५) व त्याच्या साथीदारांनी मिरज शहरात संघटित गुन्हेगारी टोळी उभी केली होती. या टोळीतील सदस्य कोणताही कायदेशीर व्यवसाय न करता, दहशत व हिंसाचाराच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवत होते. सन २०१७ ते २०२५ या कालावधीत या टोळीने खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, गंभीर मारहाण, विनयभंग, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे असे अनेक गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात एकूण १५ आरोपींवर मोक्का कायद्यातील कलम ३(१)(i), ३(१)(ii), ३(२), ३(४), ४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये टोळी प्रमुख प्रथमेश ढेरेसह मिरज व सांगली परिसरातील टोळी सदस्यांचा समावेश आहे. यातील काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यांनी प्रस्तावाचे बारकाईने अवलोकन करून मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करण्यासाठी तो विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला. त्यानंतर मा. श्री. सुनिल फुलारी यांनी संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या दृष्टीने मंजुरी दिली.
चालू सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांततेत पार पडाव्यात व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, या उद्देशाने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. भविष्यातही अशा संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास विपुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा उपविभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रणिल गिल्डा, संजीव झाडे, बसवराज शिरगुप्पी, दिपक गट्टे, राहुल जाधव, गजानन बिरादार आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.


