राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
मुंबई (प्रतिनिधी) :- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली आहे. आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी यासंदर्भातील आदेश व सहपत्र प्रसिद्ध केले आहे. या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी १६ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील.
*नामनिर्देशन प्रक्रियेचे वेळापत्रक*
उमेदवारांना १६ जानेवारी ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. मात्र रविवार १८ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाही.
नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत असेल.
*छाननी, माघार व उमेदवार यादी*
नामनिर्देशन पत्रांची छाननी २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून करण्यात येणार असून, छाननीनंतर वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी तात्काळ प्रसिद्ध केली जाणार आहे.
उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया २३, २४ व २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत होईल. दरम्यान, २५ जानेवारी (रविवार) व २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी उमेदवारी माघार घेण्याची प्रक्रिया होणार नाही.
निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी व त्यांना निशाणी वाटप २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० नंतर करण्यात येणार आहे.
*मतदान व मतमोजणी*
संपूर्ण राज्यातील संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार) रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.
मतमोजणीची प्रक्रिया ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल.
निवडून आलेल्या सदस्यांची अंतिम नावे १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
*आचारसंहिता लागू*
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व प्रशासनाने आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.


More Stories
महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ : एक मत ठरवणार शहराची पुढील दिशा
मकर संक्रातीला ‘लाडकी बहिणी’ला मोठी भेट? व्हायरल दाव्या मागचं सत्य काय…?
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद